तासगावनजीक चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात
आजोबा-आजी व नातू ठार, चौघे जखमी
तासगाव :
तासगाव-पलूस रस्त्यावरील तोडकर मळा (एचपी पेट्रोल पंपाजवळ), ता. तासगाव येथे मंगळवारी दुपारी सुमारे २.२० च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. यामध्ये दुचाकी वरील आजोबा, आजी आणि नातू तिघेजण जागीच ठार झाले, तर कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात दुचाकी (हिरो होंडा) वरील श्री. शिवाजी बापू सुतार (वय ५७), सौ. आशाताई शिवाजी सुतार (वय ४७) व वैष्णव ईश्वर सुतार (वय ५), सर्व रा. बुरली, ता. पलूस हे तिघेजण ठार झाले आहेत. ते काकडवाडी येथे नातेवाइकांना भेटून परत आपल्या गावाकडे जात होते.

अपघाताची दुसरी वाहने असलेली कार (मारुती वॅगन-आर) सांगलीकडून येत होती. या कारमधील स्वाती अमित कोळी (रा. सांगलीवाडी), पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार व अन्य एक महिला असे चौघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने तासगाव व सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडक एवढी जोरदार होती की तिघेजणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विनायक गोडसे व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत.