किरण बलियानसह अनेक खेळाडू तात्पुरते निलंबित
उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने नाडाकडून कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य मिळविलेली गोळाफेकपटू किरण बलियानचे डोपिंग प्रकरणी दोषी आढळल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजकविरोधी एजन्सीने (नाडा) तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे. याशिवाय विविधक क्रीडाप्रकारात दोषी ठरलेल्या अनेक अॅथलीट्सवरही कारवाई करण्यात आली असून त्यांची यादीही जाहीर केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बजरंग पुनियाचे नाव या यादीत देण्यात आलेले नाही. मात्र याआधीच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश होता.
नाडाने आरोपाची नोटिस जारी केली नव्हती, या कारणामुळे बजरंगवरील निलंबन शिस्तभंगविरोदी डोपिंग पॅनेलने रद्द केले होते. त्यानंतर तीन आठवड्यांनी 23 जुलै रोजी नाडाने पुनियाला दुसऱ्यांदा निलंबित केले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविलेल्या बजरंगला नाडाने 23 एप्रिल रोजी निलंबित केले होते. 10 मार्च रोजी सोनेपत येथे निवडचाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यावेळी मूत्रल चाचणीसाठी नमुने देण्यास बजरंगने नकार दिल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई झाली होती. युनायटेड रेसलिंग वर्ल्ड या जागतिक संघटनेनेही त्याला निलंबित केले होते.
कारवाई झालेल्या अन्य अॅथलीट्समध्ये होताडाफेक करणारी मंजू बाला, शालिनी चौधरी, लांब पल्ल्याची धावपटू छावी यादव, भालफेकपटू डीपी मनू, धावपटू दीपांशी व मध्यम पल्ल्याचा धावपटू परवेज खान, मल्ल अर्जू, बॅडमिंटनपटू कृष्ण प्रसाद गरग, वुशू खेळाडू टी. मेनका देवी, मनजिंदर सिंग, गौतम शर्मा, भूपेन्द्र सिंग ब्याडवाल (पेनकॅक सिलट), आशिष फुगाट (रोईंग), रिबासन सिंग निंगथौजम (कॅनोई) यांचाही समावेश असून त्यांना नाडाकडून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे