अल्कारेझ पराभूत, व्हेरेव्ह विजयी
वृत्तसंस्था / ट्युरीन
2024 च्या टेनिस हंगामाअखेरच्या येथे सुरू झालेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत रुमानियाच्या कास्पर रुडने स्पेनच्या अल्कारेझला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात खेळताना अल्कारेझला पोटदुखीची समस्या जाणवत होती. दुसऱ्या एका सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने रशियाच्या रुबलेव्हवर मात केली. पुरुष दुहेरीत बोपन्ना आणि एब्डन या जोडीने आपल्या मोहीमेला पराभवाने प्रारंभ केला.
ही स्पर्धा राऊंड रॉबीन पद्धतीने खेळविली जाते. प्रत्येक वर्षाच्या टेनिस हंगामाअखेर ती घेतली जाते. या स्पर्धेत एटीपी मानांकनांतील पहिले 8 टेनिसपटू पात्र ठरविले जातात. पुरुष एकेरीच्या सामन्यात कास्पर रुडने कार्लोस अल्कारेझचा 6-1, 7-5 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. या सामन्यात खेळताना अल्कारेझला पोटदुखीच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. दुसऱ्या एका समान्यात जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हने रशियाच्या आंद्रे रुब्लेवचा 6-4, 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 टेनिसपटू 2 गटात विभागात आले आहेत. अन्य सामन्यामध्ये इटलीच्या जेनिक सिनेरने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरचा तर अमेरिकेच्या फ्रिजने रशियाच्या मेदव्हेदेवचा पराभव केला. जर्मनीच्या व्हेरेव्हने आतापर्यंत ही स्पर्धा दोनवेळा जिंकली आहे. रुमानियाच्या रुडने 2021 साली या स्पर्धेत उपांत्यफेरी तर 2022 साली त्याने अंतिम फेरी गाठली होती. जर्मनीच्या व्हेरेव्हने 2018 साली आणि 2021 साली ही स्पर्धा जिंकली होती.
पुरुष दुहेरीच्या पहिल्या सामन्यात रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार एब्डन यांना पहिल्याच फेरीत इटलीच्या जोडीकडून पराभव पत्कारावा लागला. इटलीच्या बोलेली आणि व्हेव्हासोरी यांनी बोपन्ना आणि एब्डन यांचा 56 मिनिटांच्या कालावधीत 6-2, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. बॉब ब्रायन गटामध्ये सध्या बोपन्ना आणि एब्डन हे चौथ्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीत उपांत्य फेरी गाठली होती.