‘पीएमश्री’त बेळगावमधील सात शाळांचा समावेश
2 कोटी 9 लाखांचा मिळणार निधी : उचगाव सरकारी मराठी शाळेचा समावेश : टप्प्याटप्प्याने विकासकामे राबविली जाणार
बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सात सरकारी शाळांची प्रधानमंत्री स्कूल ऑफ रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेमध्ये निवड झाली आहे. या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने विकासकामे राबविली जाणार आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातून 100 शाळांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी केवळ सात शाळांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी शाळांच्या विकासासाठी पीएमश्री योजना सप्टेंबर 2022 मध्ये सुरू केली. सरकारी शाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी मॉडेल स्कूलच्या धर्तीवर पीएमश्री योजना लागू करण्यात आली. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शाळांपासून प्रायोगिक तत्त्वावर केली जाणार आहे. देशातील 2 लाख 50 हजार सरकारी शाळांमधून 9 हजार शाळांची योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2 कोटी 9 लाख रुपये शाळेसाठी अनुदान दिले जाणार आहे. यातून शाळेमध्ये अत्याधुनिक वर्गखोल्या, स्वच्छतागृह, बगीचा याचबरोबर प्रशस्त मैदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील सात शाळांची 2023 मध्ये निवड झाली होती. ही रक्कम शाळांना टप्प्याटप्प्याने खर्च करता येणार आहे. जिल्हाशिक्षणाधिकारी पवनकुमार हंचाटे म्हणाले, सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, क्रीडा साहित्य, ग्रंथालय व सुसज्ज प्रयोगशाळा अशा सुविधा पुरविण्यासाठी पीएमश्री योजना महत्त्वाची ठरणार आहे. शिक्षकांनाही यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील केवळ एकाच मराठी शाळेची निवड
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात बेळगाव शहर, तालुका व खानापूर या परिसरात मराठी माध्यमांच्या शाळा अधिक प्रमाणात आहेत. परंतु शैक्षणिक जिल्ह्यात केवळ एकाच मराठी शाळेची पीएमश्री योजनेमध्ये निवड करण्यात आली आहे. उचगाव येथील उच्च प्राथमिक शाळेची या योजनेमध्ये निवड झाली असून शाळेला 14 लाख 7 हजार रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आला आहे. तर खानापूर येथील कन्नड उच्च प्राथमिक शाळेची निवड झाली असून 9 लाख 9 हजार रुपयांचा निधी शाळेला दिला आहे.
पाच वर्षांत विकासकामे होणार...
मागील वर्षात आमच्या शाळेची पीएमश्री योजनेत निवड झाली. एकूण 2 कोटी रुपयांचा निधी खर्च करून शाळेमध्ये विविध सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने विकासकामे राबविली जाणार आहेत.
- आप्पाण्णा तळवार (मुख्याध्यापक-उच्च प्राथमिक शाळा, उचगाव)