आठपैकी सात आमदारांनी मांडली बाजू
ऑक्टोबरमध्ये होणार अंतिम सुनावणी : सभापतींची माहिती
विशेष प्रतिनिधी/प्रतिनिधी
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सभापती रमेश तवडकर येत्या तीन व चार ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी घेणार आहेत. तशी माहिती त्यांनीच शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. आठ आमदारांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर तसेच माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सभापतींसमोर अपात्रतेच्या याचिका सादर केल्या आहेत. साल 2022 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेसचे 11 आमदार विजयी झाले होते. मायकल लोबो हे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करून मोकळे झाले होते. त्यानंतर आठही आमदारांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या पाटकर, चोडणकर यांच्या याचिका सभापतींकडे आल्या होत्या. ज्यांनी या त्या सादर केल्या, ते दोन्ही नेते विधानसभागृहाचे सदस्य नाहीत. अनेक महिने सभापतींनी सुनावणी घेतली नसल्याने चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने सभापतींना चार नोव्हेंबरपर्यंत निवाडा द्यावा, असे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी सायंकाळी सभापतींनी विधानसभा प्रकल्पात विशेष सुनावणी घेतली. त्यामध्ये आठपैकी सात आमदारांनी आपले म्हणणे सादर केले आहे. आता तीन व चार ऑक्टोबर रोजी सभापतींनी या विषयावर अंतिम सुनावणी ठेवली आहे.