बिश्नोईच्या मुलाखतप्रकरणी सात अधिकारी निलंबित
कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका : पंजाबच्या गृह विभागाची दोन वर्षांनंतर कारवाई
वृत्तसंस्था/ चंदीगड
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या कारागृहातील मुलाखतीप्रकरणी सरकारने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या एसआयटीने कर्तव्यावर असताना निष्काळजीपणाचा आरोप ठेवलेल्या 7 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे. पंजाब पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली आहे. लॉरेन्स बिश्नोई याची ही मुलाखत दोन वर्षांपूर्वी तुऊंगात घेण्यात आली होती. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी दोन उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सात कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे.
लॉरेन्स बिश्नोई यांची एक मुलाखत मोहाली येथे पंजाब पोलिसांच्या ताब्यात असताना घेण्यात आली होती, तर दुसरी मुलाखत राजस्थानमध्ये घेण्यात आली होती. याप्रकरणी विशेष पोलीस महासंचालक (मानवाधिकार) यांच्या नेतृत्वाखालील राज्य पोलिसांच्या एसआयटीला काही अधिकारी दोषी असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी एसआयटीने सात पोलिसांवर कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्यानंतर हे निलंबन करण्यात आले आहे.
पंजाबच्या गृह सचिवांनी जारी केलेल्या आदेशानुसार, एसपी गुरशेर सिंग संधू, डीएसपी समर वनीत, उपनिरीक्षक रीना (सीआयए खरार), उपनिरीक्षक जगतपाल जंगू, उपनिरीक्षक शगनजीत सिंग, सहायक उपनिरीक्षक मुख्तियार सिंग आणि हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश यांना निलंबित करण्यात आले आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये घेतली मुलाखत
एका खासगी टीव्ही चॅनेलवर प्रसारित केलेली बिश्नोईची मुलाखत 3 आणि 4 सप्टेंबर 2022 च्या मध्यरात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली होती. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन वरील सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. गृह सचिवांच्या आदेशात एसआयटी अहवालाचा हवाला देण्यात आला आहे.