माळमारुती पोलिसांची कारवाई
बेळगाव : शहर तसेच परिसरात चोरी करणाऱ्या अट्टल चोराला माळमारुती पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 7 लाखाचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या उपायुक्त पी. व्ही. स्नेहा व मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जी. एम. कालीमिर्ची आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. परशराम इराप्पा दंडगल (वय 32, रा. गुरुदेव गल्ली, लक्ष्मीनगर, जुने बेळगाव) असे त्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याने शहर तसेच इतर परिसरात चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी तपास करून या अट्टल चोराला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडील 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 1 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण 7 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, एम. जी. कुरेर, सी. जी. चिन्नप्पगोळ, बी. एफ. बस्तवाड, सी. ए. चिगरी, के. बी. गोरानी, व्ही. एस. होसमनी, रवी बारीकर, एम. के. मुजावर, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशीद, तबरेज बागवान, बाहुबली अनगाली यांनी या कारवाईत भाग घेतला होता.