महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सव्वाशे कर्मचारी अन् साडेचार हजाराहून अधिक तक्रारी

06:40 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वीजग्राहकांच्या दररोज 600 तक्रारींचा पाऊस ;   घरगुती ग्राहकांनी सहकार्य करण्याचे हेस्कॉमचे आवाहन

Advertisement

प्रतिनिधी/बेळगाव

Advertisement

मागील आठवडाभरात झालेल्या सततच्या पावसामुळे वीजपुरवठ्यामध्ये वारंवार व्यत्यय येत आहे. काही ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर निकामी झाले आहेत. तर काही ठिकाणी विद्युतवाहिन्यांवर झाडे कोसळली आहेत. मागील आठवडाभरात तब्बल 4 हजार 670 तक्रारी हेस्कॉमकडे नोंदविण्यात आल्या आहेत. शहरात देखभाल कर्मचारी केवळ 135 असून तक्रारी मोठ्या प्रमाणात असल्याने दुरुस्तीचे काम करताना विलंब होत असल्याने अनेक नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.

एरव्ही शहरात दररोज 30 ते 40 विजेच्या तक्रारी ग्राहकांकडून दाखल केल्या जातात. परंतु, सध्या सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे दररोज 600 ते 700 तक्रारी दाखल होत आहेत. घरगुती तक्रारींपेक्षा सार्वजनिक तक्रारींना पहिले प्राधान्य दिले जाते. ज्या ठिकाणी झाड कोसळून वीजपुरवठा बंद झाला असेल अथवा ट्रान्स्फॉर्मर निकामी झाला असेल, त्याठिकाणी प्रथम प्राधान्य कर्मचारी देतात. बऱ्याचवेळा झाड तोडण्यास विलंब लागत असल्यामुळे दुरुस्तीचे काम करणे एक ते दीड दिवस जात असल्याने कर्मचारीही वैतागले आहेत.

हेस्कॉमचे बेळगाव शहरामध्ये एकूण 9 सेक्शन आहेत. प्रत्येक सेक्शनमध्ये दुरुस्तीसाठी पंधरा कर्मचारी देण्यात आले आहेत. याबरोबरच 24 तास दुरुस्ती वाहन देण्यात आले आहे. काहीवेळा आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांची आयात केली जाते. परंतु, दुरुस्तीसाठीचे एकूण कर्मचारी 135 असताना तक्रारी मात्र दररोज शेकडो असल्यामुळे दुरुस्ती नेमकी कशी करायची? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहे.

फोन व्यस्त असल्याची तक्रार

हेस्कॉमने रेल्वेस्टेशनसमोरील कार्यालयामध्ये मुख्य हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे. याबरोबरच प्रत्येक सेक्शनवर तक्रारींची नोंदणी करून घेतली जाते. परंतु, सेक्शन ऑफिसमधील लँडलाईन क्रमांक नेहमीच व्यस्त असतो अथवा तो लागत नाही, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. यामुळे हेस्कॉमकडून या समस्येवर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. तक्रारींमध्ये वाढ झाली असली तरी प्रत्येक तक्रारीची नोंद होणे तितकेच गरजेचे आहे.

शहरात रेल्वेस्टेशन, गोवावेस, उद्यमबाग, शहापूर, गांधीनगर, खंजर गल्ली, सुभाषनगर, महांतेशनगर, वैभवनगर या ठिकाणी सेक्शन ऑफिस असून प्रत्येक ठिकाणी दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्या-त्या विभागामध्ये तक्रारी नोंदविण्याचे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे. सध्या पावसाचा जोर अधिक असल्यामुळे काही ठिकाणी चिखलामुळे दुरुस्ती करणेही अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनीही सामंजस्यपणा दाखवणे गरजेचे आहे.

पावसामुळे कार्बन धरण्याचे प्रकार वाढले

हेस्कॉमच्या ट्रान्स्फॉर्मरपासून घरगुती ग्राहकांना केबलद्वारे वीजपुरवठा दिलेला असतो. वर्षभर वीजपुरवठा करताना कधी जास्त तर कधी कमी दाबाने वीजपुरवठा होत असतो. ज्या ठिकाणी खांब्यावर मुख्यवाहिनीला कनेक्शन जोडलेले आहे, त्याठिकाणी कार्बन तयार होत असतो. जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा हा कार्बन मुख्य वाहिनीपासून दुसरी विद्युतवाहिनी तोडतो. मागील आठवडाभरात घरगुती ग्राहकांमधून 90 टक्के तक्रारी या कार्बनच्याच असल्याचे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

मागील आठ दिवसांत झालेल्या वारा-पावसामुळे हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांची पडझड व तुटलेल्या विद्युतवाहिन्या यामुळे रात्रंदिवस दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यातच घरगुती ग्राहकांची कार्बनची समस्या निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणात तक्रारी हेस्कॉमकडे दाखल होत आहेत. दररोज शहरात 600 ते 700 तक्रारी दाखल होत असल्याने हेस्कॉमचे कर्मचारी टप्प्याटप्प्याने दुरुस्तीचे काम पूर्ण करीत आहेत.

- संजीव हम्मण्णावर (साहाय्यक कार्यकारी अभियंता)

विभाग                                           फोन क्रमांक

24 तास तक्रार निवारण क्रमांक      2426679

गोवावेस                                   2423800

उद्यमबाग                                 2440205

शहापूर                                 2488700

खंजर गल्ली                           2461201

सुभाषनगर                         2474825

महांतेशनगर                      2454272

वैभवनगर                         2447519

पिरनवाडी                         2411011

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article