चिपळूण हाफ मॅरेथॉनसाठी देशभरातून सातशे स्पर्धक
चिपळूण :
येथील संघर्ष क्रीडा मंडळ व चिपळूणकरांच्या सहकार्याने २९ डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन या राष्ट्रीय २१ किलोमीटर स्पर्धेचे आयोजन करण्यात चाले आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून प्लास्टिक मुक्तीचा संदेश सर्वदूर पसरवण्याचा मानस असल्याने चला धावू या प्लास्टिक मुक्तीसाठी, असे घोषवाक्य तयार करण्यात आल्याचे मंडळाचे भाऊ काटदरे यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी देशभरातून उत्स्फूर्तपणे मॅरेथॉनपटू सहभागी होत असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आतापर्यंत आंध्रप्रदेश, छत्तीसगड, आसाम, दिल्ली, गोवा, हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब या राज्यातून व महाराष्ट्रातील अहमदनगर, बदलापूर, बुलडाणा, मुंबई, सांगली, कोल्हापूर, लातूर, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, पोलादपूर, पुणे, चिपळूण हाफ मॅरेथॉन सातारा या ठिकाणाहून सातशेच्या वर स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
ही स्पर्धा २१ किलोमीटर, दहा किलोमीटर व पाच किलोमीटरच्या महिला व पुरुष गटात होणार असून शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रथमच वर्ष असल्याने प्रवेश मोफत देण्यात येणार आहे. या स्पर्धेत १४ ते १७, १८ ते २१, २१ ते ३०, ३१ ते ४०, ४१ ते ५०, ५१ ते ६० व ६० वर्षांवरील असे गट तयार करण्यात आले असून या गटात येणाऱ्या प्रत्येकी पाच स्पर्धकांना रोख बक्षीस व शिल्ड देण्यात येणार आहे. शिवाय स्पर्धा नियोजित वेळेत पूर्ण या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला मिळून एकूण अडीच ते तीन हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये पुरुष व महिला मिळून ११२ बक्षिसांची रक्कम ७ लाख रुपये इतकी आहे. खेळाडूंना मेडल, टी-शर्ट व बॅग देण्यात येणार असून त्या रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेल्या असतील. या स्पर्धेच्या तयारीसाठी आयर्न मॅन डॉ. तेजानंद गणपत्ये, डॉ. संजय भागवत, मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे खेळाडू व सभासद परिश्रम घेत आहेत. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी व लांजा तालुक्यातील शाळांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले असून सुमारे साडेसातशे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली. या स्पर्धेसाठी एक विशेष गीत बनवण्यात आले आहे. ते प्राध्यापक नीलकंठ गोखले यांनी संगीतबद्ध केले असून प्रियंका बापट, गौरी खोत, निळकंठ गोखले यांनी गायले असून सौरभ वेलणकर, साहिल गुरव, सुरज गुरव यानी संगीत साथ दिली आहे. स्पर्धेचे सूत्रसंचालन चिपळूणची सुकन्या, अभिनेत्री, सूत्रसंचालक ऐश्वर्या नागेश करणार आहे.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक येथून ही स्पर्धा सुरू होऊन बहादूरशेख नाका, कळंबस्ते, वालोपे, परशुराम घाटमार्गे परशुराम थांब्यापर्यंत जाऊन परत त्याच मार्गे परत येईल. २१ किलोमीटर स्पर्धा सकाळी ६.३० वाजता सुरू होईल, दहा कि.मी. स्पर्धा ५.४५ वाजता आणि पाच किलोमीटर स्पर्धा ७ वाजता चालू होईल आणि चिपळूणमधील शालेय स्पर्धा सकाळी ८ वाजता सुरु होईल, असे काटदरे यांनी सांगितले.