For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीलंकेसोबत सात करारांवर स्वाक्षऱ्या

06:58 AM Apr 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
श्रीलंकेसोबत सात करारांवर स्वाक्षऱ्या
Advertisement

भारतीय मच्छिमारांच्या सुटकेची नरेंद्र मोदींची मागणी : प्रतिष्ठित ‘मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मानित

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या श्रीलंका दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्री आणि सहकार्याचा एक नवा अध्याय सुरू केला. शनिवारी कोलंबोमध्ये पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमध्ये 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांमध्ये संरक्षण, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. याशिवाय, पंतप्रधान मोदींना श्रीलंकेने ‘मित्र विभूषण’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीलंकेकडून परदेशी नागरिकांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्यात येथे द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी मोदींनी भारतीय मच्छिमारांच्या अटकेवर चर्चा केली. समुद्रातील मासेमारी हा मच्छिमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. आम्ही मच्छिमारांना ताबडतोब सोडण्याबद्दल आणि त्यांच्या बोटी सोडण्याबद्दल बोललो आहोत. या प्रकरणात आपण मानवतेने पुढे जायला हवे यावर आम्ही सहमत आहोत, असे मोदी म्हणाले. तसेच तमिळ मुद्द्यावर भाष्य करताना श्रीलंकेचे सरकार तमिळ लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल आणि श्रीलंकेच्या संविधानानुसार त्यांना देण्यात आलेले पूर्ण अधिकार लागू करेल, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी थायलंडहून श्रीलंकेत पोहोचले. ते तीन दिवस म्हणजेच रविवारपर्यंत श्रीलंकेत राहणार आहेत. विशेष म्हणजे श्रीलंकेत पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे भव्यदिव्य पद्धतीने स्वागत करण्यात आले. विमानतळावर आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळातील पाच मंत्री उपस्थित होते. त्यानंतर कोलंबोमध्ये पंतप्रधान मोदींना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या या भेटीवर चीन निश्चितच लक्ष ठेवून आहे. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अधिक महत्त्वाची आहे.

पंतप्रधानांचे भव्य स्वागत

पंतप्रधान मोदी श्रीलंकेत पोहोचले तेव्हा श्रीलंका सरकारचे पाच मंत्री तिथे उपस्थित होते. तसेच भारतीय समुदायातील अनेक लोक आणि संघटनांचे प्रतिनिधी विमानतळावर उपस्थित होते. मुसळधार पाऊस असूनही शेकडो श्रीलंकन आणि प्रवासी भारतीय रस्त्यावर उभे असल्याचे दिसून आले. पंतप्रधान येताच हे लोक मोदी-मोदीच्या घोषणा देऊ लागले. यानंतर, शनिवारी कोलंबोमधील इंडिपेंडन्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचे भव्य औपचारिक स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात पंतप्रधान हरिनी अमरसुरिया आणि दिसानायके यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्य उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींना विशेष सन्मान

पंतप्रधान मोदी यांना श्रीलंकेत ‘मित्र विभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी आणि सामायिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी केलेल्या असाधारण प्रयत्नांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. पंतप्रधान मोदींना विदेशातून मिळालेला हा 22 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मित्र विभूषण’ पुरस्कार प्रदान केला.  त्यानंतर बोलताना हा सन्मान फक्त माझा नाही तर 140 कोटी भारतीयांचा असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चा

भारताचे पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. या बैठकीनंतर भारत आणि श्रीलंका संरक्षण, ऊर्जा सुरक्षा आणि डिजिटलायझेशन या क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासह विविध क्षेत्रांवर करार करण्यात आले.

सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी कोलंबो येथे सामपूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे संयुक्तपणे व्हर्च्युअल प्रणालीद्वारे उद्घाटन केले. सामपूर हा श्रीलंकेच्या पूर्व त्रिंकोमाली जिह्यात स्थित 120 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. भारताच्या राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ (एनटीपीसी) आणि श्रीलंकेच्या सिलोन विद्युत मंडळ (सीईबी) यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट श्रीलंकेच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करणे, जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणे असे आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील महत्त्वाचे करार....

संरक्षण सहकार्य करार : भारत आणि श्रीलंकेतील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा करार संरक्षण सहकार्याबाबत होता. हा करार हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा सहकार्य वाढविण्यावर भर देतो.

ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य : भारत, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) यांच्यात ऊर्जा क्षेत्रातील त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये श्रीलंकेला ऊर्जा केंद्र बनवण्यासाठी सहकार्य समाविष्ट आहे. दोन्ही बाजूंनी त्रिंकोमालीला ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.

डिजिटल परिवर्तन : माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वाचा करार करण्यात आला. या कराराचा उद्देश तांत्रिक विकासात भागीदारी करणे आहे.

सौर ऊर्जा प्रकल्प : अक्षय ऊर्जेच्या विकासासाठी, विशेषत: सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी एक करार करण्यात आला.

आरोग्य क्षेत्रात सहकार्य : आरोग्य सेवा आणि वैद्यकीय संशोधनात सहकार्यासाठी एक करार करण्यात आला. या कराराचा फायदा दोन्ही देशांच्या नागरिकांना होईल.

औषधनिर्माण सहकार्य : औषध उद्योगात सहकार्य वाढविण्यासाठी श्रीलंका आणि भारत यांच्यात करार झाला. यामध्ये औषधांचा पुरवठा आणि संयुक्त संशोधन यांचा समावेश आहे.

सांस्कृतिक आणि धार्मिक नूतनीकरण : भारताने श्रीलंकेतील सीता एलियासह अनेक मंदिरांच्या नूतनीकरणात सहकार्य करण्याशी संबंधित करारालाही मूर्त स्वरुप दिले आहे.

Advertisement
Tags :

.