दर्शनसह सात आरोपींना जामीन
बेंगळूर : चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खूनप्रकरणी कन्नड सिनेअभिनेता दर्शन, पवित्रागौडासह सात आरोपींना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दर्शनला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. रेणुकास्वामी याच्या खुनाच्या घटनेनंतर सहा महिन्यांनंतर दर्शनसह इतर सात आरोपींना जामीन मिळाला आहे. पाठदुखीमुळे त्रस्त असलेल्या दर्शनला दीड महिन्यापूर्वी उपचार घेण्यासाठी अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र नियमित जामिनासाठी त्याने याचिका दाखल केली होती. वाद-युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती विश्वजित शेट्टी यांनी शुक्रवारी दर्शन, पवित्रागौडा, प्रदूश, अनुकुमार, नागराज, लक्ष्मण, जगदीश यांना जामीन मंजूर केला. रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणात 11 जुलै रोजी पोलिसांनी सिनेअभिनेता दर्शनला अटक केली होती.