For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हॅक्सिन डेपोत झाडांना आग लावण्याचे प्रकार

10:39 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हॅक्सिन डेपोत झाडांना आग लावण्याचे प्रकार
Advertisement

समाजकंटकांना वेळीच थांबविणे गरजेचे

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहराचे फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या व्हॅक्सिन डेपो येथील वनसंपदा जाळून खाक करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून सुरू आहे. रात्रीच्यावेळी मद्यपींकडून गवताला आग लावण्याचा प्रयत्न होत असून यामुळे मोठे वृक्ष जळत आहेत. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी आग लावली जात असून हे प्रकार वेळीच थांबविणे गरजेचे आहे. व्हॅक्सिन डेपो येथे अनेक दुर्मीळ वनस्पती तसेच वृक्ष आहेत. याठिकाणी झाडांचे जतन करण्यात आल्याने सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. झाडांचे हिरवेगार आच्छादन असल्यामुळे व्हॅक्सिन डेपोला प्रथम प्राधान्य दिले जाते. परंतु मागील काही दिवसांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व्हॅक्सिन डेपो येथे अवैध प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळी तर मद्यपींकडून धिंगाणा घातला जात आहे. यामुळे परिसरात दारूच्या बाटल्या व ट्रेटापॅकचे तुकडे सर्वत्र दिसून येत आहेत.

मंगळवारीही आग लावण्याचा प्रकार

Advertisement

दोन दिवसांपासून अज्ञातांकडून रात्रीच्यावेळी आग लावल्याने अनेक झाडे जळून गेली. तसेच मोठ्या प्रमाणात गवताचेही नुकसान झाले आहे. अनेकवेळा तक्रारी करूनदेखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने व्हॅक्सिन डेपो परिसर संकटात सापडला आहे. यामुळे व्हॅक्सिन डेपो वाचविण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न होणे गरजेचे आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास व्हॅक्सिन डेपो येथे आग लागल्याने याचा फटका चन्नम्मानगर येथील रहिवाशांना बसला. तातडीने या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच अग्निशमनच्या जवानांनी  खबरदारी घेतली.

व्हॅक्सिन डेपो शिल्लक राहील का?

व्हॅक्सिन डेपो बचावासाठी अनेक नागरिकांनी यापूर्वी आंदोलने केली आहेत. येथील निसर्ग संपदा अबाधित ठेवण्यासाठी पावसाळ्यात अनेक स्वयंसेवी संघटनांकडून वृक्षारोपण केले जाते. चित्रकला व इतर स्पर्धाही व्हॅक्सिन डेपो वाचविण्यासाठी घेतल्या जात असतात. परंतु आगीच्या घटनांनी जर झाडांचे नुकसान होत राहिले तर व्हॅक्सिन डेपो शिल्लक राहील का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Advertisement
Tags :

.