यल्लम्मा डेंगरावर जोगप्पा-जोगत्यांसाठी समुदाय भवन उभारा
कर्नाटक लैंगिक अल्पसंख्याक मंचतर्फे निवेदन
बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा डेंगरावर जोगप्पा-जोगत्यांसाठी दोन एकर जागेत समुदाय भवन उभारण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक लैंगिक अल्पसंख्याक मंचच्या सदस्यांनी केली आहे. या सदस्यांनी गुरुवार दि. 14 रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्यातील 25 हून अधिक जिल्ह्यांमध्ये जोगप्पा आणि जोगत्यांचे वास्तव्य आहे. या समुदायाने आपले हक्क मिळवून घेण्यासाठी लैंगिक अल्पसंख्याक नावाने मंच स्थापन केला आहे. राज्यात सुमारे 20 हजार जोगप्पा-जोगत्यांची लोकसंख्या आहे. सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे ते निस्सीम भक्त आहेत.
वर्षभरात यल्लम्मा डोंगरावर होणाऱ्या यात्रांना जोगप्पा-जोगत्या दर्शनासाठी हजर असतात. डोंगरावर इतर भाविकांसाठी मूलभूत सुविधा आहेत. मात्र जोगप्पा-जोगत्यांसाठी येथे कोणतीच व्यवस्था नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडी यासारख्या परिस्थितीत त्रास सहन करीत देवीची सेवा करतात. रात्री झोपण्यासाठी जागा मिळत नसल्याने रस्त्यावर कोठेही झोपून रात्र घालविण्याची वेळ त्यांच्यावर येते. डोंगरावर दोन एकर जागा राखीव ठेवून तेथे समुदाय भवन उभारल्यास जोगप्पा-जोगत्यांना सोयीचे होणार आहे. दहा वर्षांपासून समुदाय भवनाची मागणी होत आहे. मात्र सरकार असो किंवा प्रशासनाने कार्यवाही हाती घेतलेली नाही. अशी तक्रार निवेदनातून करण्यात आली. लैंगिक अल्पसंख्याक मंचचे पदाधिकारी भारती कांबळे, किरण चिट्टी, दीक्षा सावंत, रामकुमार सुणगार आदी निवेदन देताना उपस्थित होते.