सर्व संघटनांच्या पथसंचलनासाठी तारखा निश्चित करा!
उच्च न्यायालयाचे कलबुर्गी जिल्हा प्रशासनाला निर्देश
बेंगळूर : कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर येथे पथसंचलनाला तहसीलदारांनी परवानगी नाकारल्याने रा. स्व. संघाने उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठात धाव घेतली होती. रा. स्व. संघाप्रमाणेच इतर संघटनांनीही पथसंचलनाला परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे खंडपीठाने शुक्रवारी कलबुर्गी जिल्हा प्रशासनाला विविध संघटनांच्या पथसंचलनासाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. रा. स्व. संघासह विविध संघटनांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. जी. शुकुरे कमल यांनी, कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने विविध संघटनांसाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित कराव्यात. एखाद्या वेळेस अपयश आल्यास न्यायालयाच तारीख निश्चित करेल, असे सांगून सुनावणी 13 नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलली. पुढील सुनावणीवेळी योग्य माहितीसह हजर राहण्याची सूचना खंडपीठाने कलबुर्गी जिल्हा प्रशासनाला दिली. चित्तापूरमध्ये रा. स्व. संघाला पथसंचलनासाठी परवानगी देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला द्यावेत, अशी याचिका संघाने दाखल केली होती. शुक्रवारी सुनावणीनंतर न्यायालयाने कलबुर्गी जिल्हा प्रशासनाला विविध संघटनांच्या पथसंचलनासाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्याचे निर्देश दिले.