अशीही सुपारी
‘सुपारी’ घेऊन कोणीतही कोणालातरी मारहाण केली, किंवा कोणीतही कोणाची तरी हत्या केली, अशा वृत्तांचा आपल्याला परिचय आहे. मात्र, असे प्रकार आजवर गुप्तपणे चालत असत. गुप्तपणे याचा अर्थ असा की, अशा सुपारीची कोणी जाहिरात करीत नसे. पण आताचा काळ ‘ऑनलाईन’चा आहे. त्यामुळे सुपारी घेऊन मारहाण करण्याची सेवाही ऑन लाईन देण्यास प्रारंभ झाला आहे. सोशल मिडियावर अशा प्रकारची एक जाहीरातही झळकल्याने लोक आचंबित आहेत.
आपल्याला ज्याला मारहाण करायची आहे, त्याचे नाव आणि ठावठिकाणा कळविल्यास आणि ठरविलेले ‘शुल्क’ दिल्यास त्या व्यक्तीची हाडे सैल केली जातील, अशा अर्थाची ही जाहीरात आहे. ज्यांनी विश्वासघात केला आहे, असे माजी प्रियकर किंवा प्रेयसी, तसेच ज्यांना धडा शिकवायचा आहे, असे नातेवाईक किंवा कुटुंबिय मंडळी, इत्यादींना मारहाण करायची असल्यास तसे ‘कंत्राट’ ऑनलाईन देता येईल, या जाहीरातीत स्पष्ट करण्यात आले आहे. आश्चर्याचा भाग तर पुढेच आहे. अशा मारहाणीचे दर वेगवेगळ्या संबंधितांसाठी वेगवेगळे आहेत. तसेच ते इतके कमी आहेत, की कोणालाही परवडू शकतील. अलीकडच्या काळात ही ‘सुपारी’ही इतकी स्वस्त झाल्याचे पाहून विस्मय वाटल्याशिवाय राहणार नाही. माजी प्रियकर किंवा प्रेयसी यांना हाणण्यासाठी केवळ 100 रुपये दर आहे. तुमच्यावर जीव लावून बसलेल्या पण तुम्हाला नको असलेल्याचा बंदोबस्त करण्यासाठी फक्त 50 रुपये, काकाला हाणायचे असेल तर 300 रुपये दर आहे, तर आजोबांसाठी मात्र तो 500 रुपये निर्धारित करण्यात आला आहे. गमतीचा भाग असा की शिक्षकांची ‘पिटाई’ करायची असेल ती ‘विनामूल्य’ आहे.
आता अशा जाहिरातीला कायद्याने अनुमती कशी दिली हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचीही सोय या जाहीरातीत आहे. जाहीरातीच्या शेवटी असा उल्लेख आहे, की हे सर्व मजेचा भाग म्हणून आहे. प्रत्यक्षात अशी मारहाण केली जाणार नाही. केवळ आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी हे आहे. या जाहीरातीला प्रचंड लोकप्रियता मिळाल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी पोटभर हसून या जाहिरातीचा आनंद घेतला असून वेगवेगळ्या विनोदी प्रतिक्रियाही सोशल मिडियावर व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.