वेर्णा आग दुर्घटनेला सर्व्हिस सेंटर जबाबदार : आलेक्स रेजिनाल्ड
मडगाव : गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल बुधवारी वेर्णा औद्योगिक वसाहतीला भेट देऊन कारना आग लागून झालेल्या दुर्घटनेची पाहणी केली. या घटनेला सर्व्हिस सेंटर जबाबदार असल्याचे स्पष्ट करून या सर्व्हिस सेंटरवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. या घटनेतून डोळे उघडले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून सर्व्हिस सेंटरच्या बाहेर कार पार्क करण्यात आल्या होत्या व त्या हटविण्याची नोटीस सर्व्हिस सेंटरला बजावली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कार तशाच पार्क करून ठेवल्याने ही घटना घडली. जर नोटीस मिळताच उपाय योजना आखली असती तर येवढी मोठी दुर्घटना घडली नसती असे ही त्यांनी म्हटले आहे. सर्व्हिस सेंटरचा निष्काळजीपणा स्पष्ट झाला असून आता त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले. या घटनेतून सर्वांचे डोळे उघडले पाहिजेत. सर्व कंपन्यांनी सभोवतालचे गवत कापून टाकावे व संभाव्य धोक्यापासून बचाव करावा अशी सूचना ही त्यांनी केली आहे.