For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व्हरची समस्या...लाभार्थ्यांच्या रांगा!

12:20 PM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्व्हरची समस्या   लाभार्थ्यांच्या रांगा
Advertisement

रेशन वितरणाची समस्या कायम असल्याने नागरिकांना नाहक त्रास

Advertisement

बेळगाव : रेशन वितरणाची समस्या अद्याप कायम असल्याने लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच उशिराने रेशन वितरण होत आहे. त्यात सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे डोकेदुखी वाढली आहे. रेशनसाठी लाभार्थ्यांना तासन्तास ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे. यामध्ये रेशन वितरक आणि लाभार्थ्यांमध्ये वादावादीही होऊ लागली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने सर्व्हरची समस्या मार्गी लावून रेशन वितरण सुरळीत करावे, अशी मागणीही होत आहे.

शासनाकडून दरमहा 3 ते 4 तारखेला रेशन वितरण केले जाते. मात्र ऑक्टोबर पंधरवडा संपल्यानंतर देखील लाभार्थ्यांच्या पदरात अद्याप रेशन नाही. त्यातच आता सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने रेशन वितरणाचा घोळ वाढत चालला आहे. रेशन घेण्यासाठी लाभार्थ्यांना संघर्ष करावा लागत आहे. रेशन दुकानामध्ये सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने एका लाभार्थ्यासाठी अर्धातास वेळ लागत आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांपर्यंत रेशन कधी पोहोचणार असा प्रश्नही पडू लागला आहे. शासनाकडूनच सर्व्हरची समस्या असल्याचे रेशन वितरक सांगत आहेत.

Advertisement

साठा उपलब्ध पण, सर्व्हर समस्या कायम

सध्या मानसी 5 किलो तांदळाचे वितरण केले जात आहे. बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना हा पुरवठा केला जात आहे. त्याबरोबर राज्य सरकारकडून अन्नभाग्य योजनेंतर्गत निधी दिला जात आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यातील रेशन वितरण सर्व्हरच्या समस्येमुळे त्रासदायक बनले आहे. आधीच रेशन वितरणाला विलंब झाला आहे. त्यातच सर्व्हरच्या समस्येने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. दुकानात तांदळाचा साठा उपलब्ध असला तरी सर्व्हरच्या समस्येमुळे वितरणात अडचणी येत असल्याचे दिसत आहे.

रेशन वितरण प्रक्रिया सुरळीत करण्याची संघटनेतर्फे मागणी

ऑक्टोबर महिन्यातील रेशन वितरणाला विलंब झाला आहे. त्यातच सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे रेशन वितरण प्रक्रिया संथगतीने  आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना समस्या निर्माण होत आहेत. तातडीने रेशन वितरणाची प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी दुकानदार संघटनेतर्फे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दर महिन्याला पाच ते सात तारखेपर्यंत रेशनचे वितरण होते. मात्र ऑक्टोबर महिना अखेरीस आला तरी रेशन वितरण झाले नाही. त्यामुळे रेशन वितरक आणि लाभार्थ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. खात्याकडूनच सर्व्हरची समस्या असली तरी लाभार्थी रेशन दुकानदार वितरकांना जाब विचारत आहेत. त्यामुळे रेशन वितरणाची समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  यावेळी कर्नाटक राज्य रेशन दुकानदार मालक संघटना उपाध्यक्ष राजशेखर तळवार, सरचिटणीस दिनेश बागडी, नारायण कालकुंद्री, सागर राजाई, उमेश पाटील, रविंद्र गिंडे, अशोक मन्नोळकर, बसवराज दोड्डमनी यासह रेशन दुकानदार उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.