रेशन वितरणात सर्व्हरची समस्या
एका लाभार्थ्यांसाठी अर्धा तासाहून अधिक वेळ : लाभार्थी ताटकळत : वितरण लांबणीवर
प्रतिनिधी/ बेळगाव
मासिक रेशन वितरण आधीच लांबणीवर पडले आहे. त्यातच गुरुवारपासून सुरू झालेल्या रेशन वितरणात सर्व्हरची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे एका लाभार्थ्यांसाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे. राज्य सरकारने नवे डाटा सेंटर सुरू केले आहे. मात्र सुरुवातीच्या दिवसातच सर्व्हरचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
शासनाकडून दरमहा 3 ते 4 तारखेला रेशन वितरण केले जाते. मात्र बेंगळूर येथे नवीन सर्व्हर डाटा सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ऑक्टोबरचे रेशन वितरण लांबणीवर पडले आहे. आता रेशन वितरण सुरू झाले तरी सर्व्हरची समस्या कायम आहे. ऑक्टोबर महिना अखेरकडे आला तरी रेशन मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात एपीएल, बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डधारकांची संख्या मोठी आहे. यापैकी बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्ड धारकांना मासिक 5 किलो तांदळाचा पुरवठा केला जातो. मात्र सर्व्हरच्या समस्यांनी ऑक्टोबर महिन्यातील वितरण लांबणीवर पडले आहे. सर्व्हरच्या समस्येमुळे रेशन दुकानासमोर लाभार्थ्यांच्या रांगा लागत आहेत. एका लाभार्थ्यांसाठी अर्धा तासाहून अधिक वेळ लागत असल्याने ताटकळत थांबावे लागत आहे.
येत्या दोन दिवसात समस्या मार्गी
शनिवारी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे साहाय्यक निर्देशक नजीर अहमद कनवळी यांनी काही रेशन दुकानांना भेटी देऊन सर्व्हर समस्या जाणून घेतली. येत्या दोन दिवसात समस्या मार्गी लागणार असून रेशन पुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले.
केवायसी बंधनकारक
ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी केली नाही. त्यांनी ई केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. रेशनकार्डच्या दुरुस्ती आणि नवीन रेशन कार्डचे काम थांबले आहे. त्यामुळे अनेकांना नवीन रेशनकार्डसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.