गवा रेड्याच्या हल्ल्यात चौकुळ येथील प्रौढ गंभीर जखमी
वार्ताहर/ आंबोली
चौकुळ मधलीवाडी येथील काळकादेवी येथे घराशेजारी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या जगन्नाथ साबा गावडे (वय ६०) हे गवारेडयाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे . ही घटना रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास गावडे यांच्या घरापासून सुमारे ५० मीटर अंतरावर काळकादेवी परिसरात घडली. चौकुळ येथील एका वर्षातील ही दुसरी घटना असून वर्षभरापूर्वी याच ठिकाणी सिताराम गावडे( आबा) हे गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते .दरम्यान आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जात जखमीला १०८ रुग्णवाहिकेने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे .