आजगांवकर, लोबो, परुळेकर यांच्या आरोपांची गंभीर दखल
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची माहिती : प्रत्येकाला पक्षशिस्त पाळावी लागेल
पणजी : पक्षाशी बंडखोरी करणारे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर, तसेच पक्षावर गंभीर टीका, दावे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणारे कळंगुटचे आमदार मायकल लोबो व माजी पर्यटनमंत्री दिलीप पऊळेकर यांच्या कृतीची पक्षाने गंभीर दखल घेतली असून भाजपने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर त्यावेळी उपस्थित होते. गत दि. 6 रोजी हडफडेतील बर्च नाईट क्लबला आग लागल्यानंतर राजकीय पातळीवर माजलेल्या रणकंदनात मायकल लोबो यांनीही भाग घेताना भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि टीका केली होती. त्यासंदर्भात पक्षाने आता लोबोंकडे स्पष्टीकरण मागितले आहे, असे दामू नाईक यांनी संबंधित प्रश्नावर सांगितले. कुणीही पक्षाला गृहित धरू नये. पक्ष हा कुणा एकाची संस्था, मालमत्ता नाही. ती एक संघटना असून प्रत्येकाला पक्षशिस्त पाळावी लागेल, असा इशारा नाईक यांनी दिला.
सरदेसाईंचा अकारण हवेत गोळीबार
दरम्यान, आमदार विजय सरदेसाई यांनी केलेल्या वैयक्तिक आरोपांबद्दल बोलताना नाईक यांनी, ‘धंदा, व्यवसाय कुणीही करू शकतो. मात्र तो करताना कोणत्याही प्रकारे बेकायदेशीरपणा होत असेल आणि त्यासंदर्भात एखाद्याकडे पुरावे असतील तर त्याने खुशाल तक्रार करावी. एखाद्या घरात मुलगा चोर आहे म्हणून त्याचे वडिल किंवा भाऊही चोरच असतील असे नसते. त्यामुळे सरदेसाई यांनी अशाप्रकारे खालच्या पातळीवर जाऊन आरोप करू नयेत. तसेच अकारण हवेत गोळीबार करून स्वत: साळसूदपणाचा आव आणू नये’, असा सल्ला नाईक यांनी दिला आहे.
दिल्लीच्या लोकांनी घरी का पाठविले?
याच धर्तीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांचा समाचार घेताना ज्या पक्षाचे स्वत:चे नेते, आमदार, मंत्री भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांमुळे थेट तुऊंगात गेलेले आहेत, त्यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करू नये, असे सांगितले. दिल्लीच्या लोकांनी घरी का पाठविले? त्याचे उत्तर केजरीवाल यांनी आधी द्यावे, असे आव्हानही नाईक यांनी दिले.