पुन्हा उत्खनन करण्याबाबत गंभीर चर्चा?
धर्मस्थळ प्रकरण : एसआयटी प्रमुख प्रणब मोहंती यांची तपास पथकासमवेत महत्त्वाची बैठक, विठ्ठल गौडांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याची शक्यता
बेंगळूर : धर्मस्थळ प्रकरणामुळे आणखी उत्सुकता निर्माण झाली असून एसआयटी प्रमुख प्रणब मोहंती यांनी रविवारी सुटीचा दिवस असला तरी तपास पथकासोबत महत्त्वाची बैठक घेतली. सामान्यपणे रविवारी तपास आणि चौकशीसाठी एसआयटी पथक विश्र्रांती घेत असे. परंतु सौजन्य यांचे सासरे विठ्ठल गौडा यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यावरून बंग्लेगुड्ड येथे उत्खनन करावे की नाही यावर दीर्घ चर्चा झाल्याचे समजते. एसआयटी पथकाचे तपास अधिकारी जितेंद्रकुमार दयाम, सी. ए. सायमन आदी या बैठकीत उपस्थित होते. नेत्रावतीच्या काठावर असलेल्या बंग्लेगुड्ड जंगलात मानवी अवशेषांचा ढीग असल्याचे विधान विठ्ठल गौडा यांनी केले आहे.
एसआयटी पथक आपल्याला तिथे घेऊन गेल्यानंतर पहिल्या दिवशी 5 आणि दुसऱ्या दिवशी 3 सांगाडे दिसले होते. सांगाड्यांमध्ये एका लहान मुलाचा समावेश होता, असे विठ्ठल गौडा यांनी सांगितले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यापूर्वी चिन्नय्या यांनीही असेच विधान केले होते. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. त्याने सांगितलेल्या जागेत उत्खनन केले असता त्याठिकाणी काहीच आढळून आले नव्हते. त्यामुळे तपास पथकाचे प्रयत्न व्यर्थ गेले होते. दरम्यान, चुकीची माहिती देणाऱ्या आणि धर्मस्थळाविऊद्ध बदनामी करणाऱ्या चिन्नय्या यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते.
आता, सौजन्य यांचे सासरे विठ्ठल गौडा यांनीही अशीच विधाने केली आहेत. त्यामुळे या विधानाच्या आधारावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. एसआयटी प्रमुख प्रणब मोहंती यांनी रविवारी बेळतंगडीला भेट देऊन तपास पथकाशी दीर्घकाळ सल्लामसलत केली. यावेळी त्यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली. याशिवाय, बंग्लेगुड्ड येथे उत्खनन करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. यापूर्वी 17 ठिकाणी उत्खनन केले होते. बंग्लेगुड्ड हे वनक्षेत्र असून हे ठिकाण 11अ म्हणून ओळखले गेले होते. 17 ठिकाणी कोणतेही गंभीर पुरावे सापडले नसल्याने 11अ येथे उत्खनन करणे सोडून देण्यात आले होते.
तथापि, तेथे सापडलेली काही हाडे एसआयटी पथकाने पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठविले होते. सुऊवातीला धर्मस्थळमध्ये पुरलेल्या मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी सुरू करणाऱ्या एसआयटीने धर्मस्थळाविऊद्ध सुरू असलेल्या कटाचा तपास हळूहळू सुरू ठेवला. हजारो मृतदेह पुरल्याचा दावा करणाऱ्या, परंतु ते सिद्ध करण्यात अयशस्वी ठरलेल्या चिन्नयाला अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, यूट्यूब आणि इतर माध्यमांद्वारे धर्मस्थळाविऊद्ध अपशब्द पसरवणाऱ्यांची कठोर चौकशी करण्यात आली आहे. आता, बंग्लेगुड्ड गूढतेचा तपास करण्यासाठी उत्खनन सुरू ठेवण्याबाबत आणखी चर्चा सुरू आहेत.
जिल्हा दंडाधिकारी, वन विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक
दरम्यान, विठ्ठल गौडा यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले जाण्याची शक्मयता आहे.बंग्लेगुड्ड येथे उत्खनन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. वनक्षेत्रात उत्खनन करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी आणि वन विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. या कारणास्तव, कायद्याच्या साधक-बाधकांबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बंग्लेगुड्ड येथे उत्खनन करण्यास एसआयटी अधिकारी इच्छुक असल्याचे समजते. विठ्ठल गौडा यांच्या विधानाची सत्यता सिद्ध करायची असेल तर उत्खनन केले पाहिजे. अन्यथा, खोटी माहिती दिल्याच्या आरोपाखाली विठ्ठल गौडा यांना अटक केली पाहिजे. यापैकी काहीही घडले नाही तर तपास अपूर्ण राहील, अशी चर्चा आहे.