राजीव गांधी हत्याप्रकरणावर सीरिज
सोनी लिववर पाहता येणार
सोनी लिवने अप्लॉज एंटरटेनमेंट आणि कुकुनूर मूव्हीजसोबत मिळून ‘द हंट : द राजीव गांधी अॅसासिनेशन केस’ची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर मांडण्याची तयारी केली आहे. ही वेबसीरिज पत्रकार अनिरुद्ध मित्रा यांचे पुस्तक ‘नाइन्टी डेज’वर आधारित आहे. अलिकडेच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या सीरिजच्या ट्रेलरमध्ये एका फोन कॉलने कहाणी सुरू होते, ज्यात राजीव गांधी जिवंत आहे का, अशी विचारणा केली जाते. यानंतर राजीव गांधी यांच्या हत्येची घटना समोर येते. सीरिजमध्ये या प्रकरणाचा तपास सुरू होतो. ही सीरिज हेरगिरीचे जग, गुप्तचर यंत्रणांच्या अपयशासह न्यायाची अपेक्षा करणाऱ्या लोकांच्या भावनांना दाखविणारी आहे. सीरिजमध्ये अमित सियाल हे डी.आर. कार्तिकेयन या व्यक्तिरेखेत असून ती एसआयटी प्रमुखाची आहे. अमित सियालसोबत सीरिजमध्ये साहिल वैद, भगवती पेरुमल, दानिश इक्बाल, गिरीश शर्मा, विद्युत गर्ग, शफीक मुस्तफा, अंजना बालाजी, बी. साई दिनेश, श्रुती जयन, गौरी मेनन यासारखे कलाकार सामील आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले आहे. रोहित बनवालिकर आणि श्रीराम राजन यांच्यासोबत मिळून नागेश यांनी याची कहाणीही लिहिली आहे. ‘द हंट :द राजीव गांधी अॅसासिनेशन केस’ ही सीरिज प्रेक्षक 4 जुलैपासून सोनी लिववर पाहू शकणार आहेत.