कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालिका संपली, कवित्व बाकी !

06:00 AM Aug 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताच्या नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्याच्या आठवणी आपल्या मनात कायमच्या राहतील...त्यात दुसऱ्या डावात भारतीयांनी जशी प्रचंड ताण असूनही जिगरी वृत्ती दाखविली तशी ती यापूर्वीच अभावानंच दिसली होती...कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी मालिका, त्यातही इंग्लंडच्या भूमीत असून देखील शुभमन गिलनं तो पेललेला बोजा नि त्याभरात आपल्या फलंदाजीवर होऊ न दिलेला परिणाम यासह भारताच्या दृष्टीनं या मालिकेची अनेक जबरदस्त वैशिष्ट्यां राहिली...

Advertisement

ओव्हलवर पुन्हा एकदा 1971 प्रमाणंच घडलं...त्याच मैदानावर अजित वाडेकर यांच्या संघानं नोंद केली होती ती भारताच्या ऐतिहासिक विजयाची. आम्ही मिळविलेलं ते ‘साहेबां’च्या भूमीवरील पहिलंवहिलं यश. त्यानंतर सुमारे 54 वर्षांनी कर्णधार शुभमन गिलच्या युवा आणि झुंझार संघानं प्रेक्षकांच्या भावनांशी खेळलेल्या मालिकेत. पुन्हा एकदा दर्शन घडविलं ते आकर्षक विजयाचं अन् त्याच्या आठवणी सदैव जपून ठेवण्यासारख्या...भारतानं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधताना शेवटच्या कसोटीत टी-20 सामन्याप्रमाणं यशाला गवसणी घातली ती अवघ्या सहा धावांनी. त्यावेळी आम्ही प्रत्येक गोष्टी गमावलीय असंच वाटत होतं. परंतु या संघानं दाखवून दिला तो त्यातील लढवय्यांचा भरणा...

Advertisement

पाच कसोटी सामन्यांची मालिका विसरणं शक्य होणार नाही ते दोन्ही संघ एकेमकांना एक इंच देखील मिळू नये या भावनेनं लढल्यामुळं. बेन स्टोक्स अन् पाचव्या कसोटीतील कर्णधार ओली पोप यांच्या इंग्लंडनं देखील प्रयत्नांत कसूर ठेवली नाही. स्टोक्सनं तर ‘ग्रेड-थ्री’ स्तरावरील दुखापत झालेली असून सुद्धा अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन घडविलं, तर वोक्स इंग्लंडला पराभवापासून वाचविण्यासाठी मैदानावर उतरला तो चक्क हात गळ्यात घालून...त्यापूर्वी फिरकी गोलंदाज बशिरनं यजमान संघाला यश मिळवून दिलं होतं ते बोट मोडलेलं असूनही...

भारतातर्फेही कित्येक खेळाडूंनी अशीच वृत्ती दाखविली. उदाहरणार्थ पाय मोडलेल्या रिषभ पंतनं नेटानं फलंदाजी केली आणि आर्चरला चौकाराचा प्रसाद देखील दिला. अनेकदा या मालिकेला पाहून आठवण झाली ती मोहम्मद अली नि जॉर्ज फोरमन यांच्यातील ‘हेविवेट’ लढतीच्या जमान्याची. मालिकेत धावांचा, शतकांचा पाऊस पडला अन् त्याला साथ दिली ती ‘स्लेजिंग’नंही. नेहमीप्रमाणं बऱ्याच वेळा इंग्लंडनं दर्शन घडविलं ते त्यांच्या नकारात्मक वृत्तीचं. भारताच्या फलंदाजांनी यजमानांचा प्रत्येक डाव उधळल्यानं त्यांच्यावर ही पाळी आली. त्यांना चौथ्या कसोटीत तर तोंड द्यावं लागलं ते समाजमाध्यमांकडून झालेल्या धुलाईला. परंतु या गोष्टीनं मालिकेतील रस्सीखेच पुरेपूर दाखवून दिली...

दौऱ्यापूर्वी अनेक टीकाकारांना, या खेळातील तज्ञांना वाटत होतं की, इंग्लिश प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम यांच्या ‘बाझबॉल बॉइस’ना तोंड देणं रोहित शर्मा-विराट कोहलीशिवाय खेळणाऱ्या युवा भारतीय संघाला शक्य होणार नाहीये. कारण खेळाडू कमी पडणार ते अनुभवासह दर्जा अन् झुंज देण्याच्या वृत्तीच्या बाबतीत...परंतु आपल्या या नवीन ‘ब्रिगेड’नं कोट्यावधी क्रिकेटप्रेमींना अनपेक्षितरीत्या अक्षरश: सुखद धक्का दिला. पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व करणारा कुठलाही कर्णधार हा नेहमी दबावाच्या चक्रव्युहात गरगरा फिरत असतो. मात्र शुभमन गिल तसा मुळीच वाटला नाही. त्यानं 754 धावांचा रतीब घालताना एखाद्या विदेशी कर्णधारानं इंग्लंडच्या भूमीवर इतिहासात काढलेल्या सर्वाधिक धावसंख्येला मागं टाकलं. त्यामुळं स्पष्ट झाली ती त्याच्यात लपलेली धावांची भूक आणि कुशलता...

तथापि, उच्च दर्जाचा कर्णधार बनण्यासाठी गिलला बऱ्याच गोष्टी येऊ घातलेल्या दिवसांत शिकाव्या लागतील. उदाहरणार्थ खेळाडूंचं व्यवस्थापन, गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षणाची रचना वगैरे बाबी. पण कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच दौरा असल्यानं तो भविष्यात खात्रीनं बरेच गुण आत्मसात करेल यात शंका नाही...भारतीय संघानं सांघिकतेचं जबरदस्त दर्शन घडविलं. गिलप्रमाणं यशस्वी जैस्वालनं देखील पुढं झेप घेतलीय. त्याचा पहिल्या दोन कसोटी सामन्यांतील आक्रमक खेळ नेहमीच लक्षात राहील. यशस्वीनं दोन शतकं व दोन अर्धशतकांच्या जोरावर त्याच्या कौशल्याची झलक सादर केली. परंतु सातत्याच्या आघाडीवर तो काहीसा कमी पडला...

भरवशाच्या के. एल. राहुलनं मिळविला तो भारताची नवीन ‘वॉल’ बनण्याचा मान. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी मालिका असंच म्हणावं लागेल. यशस्वी जैस्वाल व राहुल या सलामीच्या जोडीनं संघाला सुरुवातीलाच बऱ्यापैकी विश्वास मिळवून दिला...रिषभ पंत नेहमीच फलंदाजी करत आलाय तो आकर्षक पद्धतीनं, कुठल्याही दर्जेदार प्रतिस्पर्धी गोलंदाजाची पर्वा न करता. पण तो केव्हा यशस्वी होणार हे खुद्द त्याला देखील माहीत नसतं. त्यामुळं विरोधी संघ गोंधळतात आणि इंग्लंडचं सुद्धा तसंच घडलं. विशेष म्हणजे शत्रूपक्षाचे समर्थकही त्याच्या फलंदाजीवर भाळल्याशिवाय राहत नाहीत...

इंग्लिश दौऱ्यावर भारताचा सर्वांत सातत्यानं खेळलेला खेळाडू म्हणून नाव घ्यावं लागेल ते रवींद्र जडेजाचं. त्यानं वॉशिंग्टन सुंदरच्या साहाय्यानं चौथ्या कसोटीत आम्हाला पराभवापासून वाचविलं आणि थोड्याशा प्रयत्नांच्या साहाय्यानं जडेजाला तिसऱ्या सामन्यात देखील इंग्लंडला जमीनदोस्त करणं शक्य होतं...या दौऱ्यावर भारताला मिळालेला एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणजे वॉशिंग्टन. त्याच्या भात्यात तंत्र व संयम या दोन्ही गोष्टी असल्यानं क्षमता आहे ती येऊ घातलेल्या भविष्यात फार मोठ्या प्रमाणात पुढं जाण्याची...

गोलंदाजीचा विचार केल्यास प्रत्येकानं काही चांगले चेंडू टाकले, परंतु दर्जेदार ‘स्पेल्स’चा मात्र दुष्काळच पडलाय असं वाटलं (इंग्लंडच्या दृष्टीनं विचार केल्यास केल्यास त्यांना अजून अँडरसन, ब्रॉडची उणीव भरून काढता आलेली नाही हे स्पष्टपणे दिसलं. त्या तुलनेत महत्त्वाच्या गोलंदाजांपेक्षा बेन स्टोक्सनं चांगला मारा केला)...आपल्याही कुठल्याही गोलंदाजाला सातत्यानं चमकणं जमलं नाही अन् त्यात समावेश होतो तो विश्वात पहिल्या क्रमांकावर असलेल्या खतरनाक बुमराहचा देखील. मोहम्मद सिराजनं मात्र त्याच्या गैरहजेरीत बऱ्यापैकी कसर भरून काढली. शेवटच्या कसोटीत प्रसिद्ध कृष्णानं सुद्धा चांगला गोलंदाज बनण्याची क्षमता त्याच्या अंगात लपल्याचं सिद्ध केलं, तर बर्मिंगहॅम कसोटी भारताला जिंकणं शक्य झालं ते आकाश दीपच्या 10 बळींच्या जोरावर...

भारताच्या दोन्ही पराभवांना जबाबदार ठरलं ते क्षेत्ररक्षण. पहिल्या कसोटीत बुमराहच्या गोलंदाजीवर तब्बल 5 झेल सोडण्यात आले, तर दोन्ही कसोटींत मिळून एकूण 8...शिवाय तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात फार मोठं ओझं डोक्यावर घेऊन भारत खेळल्यानं पराभव स्वीकारण्याची पाळी आली...प्रशिक्षक गौतम गंभीरचा ‘सेफ्टी फर्स्ट’ पवित्रा देखील योग्य वाटला नाही नि त्यात हकनाक बळी गेला तो विश्वातील एक सर्वोत्तम ‘रिस्ट स्पिनर’ असलेल्या कुलदीप यादवचा. हर्षित राणाला ऑस्ट्रेलियात, तर अंशूल कंबोजला इंग्लंडमध्ये सहज संधी मिळाली, परंतु त्यांच्याहून कित्येक पटींनी जास्त गुणवान आणि वॉशिंग्टन सुंदर व जडेजापेक्षा अधिक भेदक असलेल्या कुलदीपकडे मात्र दुर्लक्षच करण्यात आलं...तरी देखील हा दौरा भारतीयांच्या, प्रथमच नेतृत्व सांभाळणाऱ्या शुभमन गिलच्या दृष्टीनं अक्षरश: ‘यादगार’ ठरला असंच म्हणावं लागेल. अनेकांना वाटतंय की, मालिका जिंकणं आम्हाला अशक्य नव्हतं !

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article