तब्बूच्या ‘चांदनी बार’चा येणार सीक्वेल
अनेक जुन्या हिट चित्रपटांचे सीक्वेल तयार करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. आता या यादीत आणखी एका चित्रपटाचे नाव सामील झाले आहे. तब्बूची मुख्य भूमिका असलेला आणि मधूर भांडारकर यांचे दिग्दर्शन लाभलेला चित्रपट चांदनी बारचा सीक्वेल तयार केला जाणार आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन आझाद करणार आहेत.
2001 मध्ये प्रदर्शित चांदनी बार या चित्रपटाची कथा आणि संवादलेखन मोहन आझाद यांनीच केले होते. या चित्रपटात तब्बूसोबत अतुल कुलकर्णी, राजपाल यादव, मिनाक्षी साहनी, अनन्या खरे आणि विशाल ठक्कर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
चांदनी बार या चित्रपटाने चार राष्ट्रीय पुरस्कार पटकाविले होते. यात तब्बूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर अतुल कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तर अनन्या खरेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
मोहन आझाद यांच्या दिग्दर्शनाखालील पहिला चित्रपट ‘व्हाट ए किस्मत’ हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. तर त्यांचा चांदनी बार 2 हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.