सेनुरन मुथुसामीचे पहिले कसोटी शतक
जॅन्सेनचे आक्रमक अर्धशतक, कुलदीप यादवचे 4 बळी
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भारतीय स्पिनर्सचे अपयश, सेनुरन मुथुसामीचे शानदार शतक, त्याने मार्को जॅन्सेनसमवेत केलेली उपयुक्त भागीदारी या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 489 धावा जमवित सामन्यावर नियंत्रण मिळविले. दिवसअखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद 9 धावा जमविल्या.
दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी याआधीच घेतली आहे. मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी भारताला ही कसोटी जिंकावीच लागणार आहे. महिन्यापूर्वी रावळपिंडीतील कसोटीत मुथुसामीने पाकविरुद्ध नाबाद 89 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. येथे त्याने कारकिर्दीतील पहिले शतक नोंदवताना 206 चेंडूत 109 धावा जमविल्या. त्याचा सहकारी जॅन्सेनने स्पिनर्सविरुद्ध आक्रमक फटकेबाजी करीत 91 चेंडूत 93 धावा झोडपल्या. त्यात 6 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेच्या 7 ते 11 व्या क्रमाकांवरील चार फलंदाजांनी तब्बल 243 धावांची भर घातली. मुथुसामी व व्हेरेन यांनी सातव्या गड्यासाठी 88 धावांची तर जॅन्सेनसवेत त्याने 97 धावांची भर घातली. जॅन्सेनने 7 षटकार ठोकत भारतीय भूमीत एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्याने व्हिव रिचर्ड्स व मॅथ्यू हेडन यांचा 6 षटकारांचा विक्रम मागे टाकला.
द.आफ्रिकेचा डाव 151.1 षटके चालला. विशेष म्हणजे सर्व पाचही स्पेशालिस्ट गोलंदाजांना एकाच डावात 25 किंवा त्याहून अधिक षटके गोलंदाजी करावी लागली. रिषभ पंतच्या नेतृत्वातही प्लॅन बी चा अभाव दिसून आला आणि बरसापाराच्या खेळपट्टीकडूनही गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही. कुलदीप यादवने पहिल्या दिवशीच्या डावपेचात बदल करून त्याने वेगात बदल केला. पण मुथुसामी, व्हेरेन (122 चेंडूत 45 धावा), जॅन्सेन यांनी त्याची गोलंदाजी बरोबर ‘वाचत’ त्याच्यावर आक्रमण केले. त्याने वेग वाढवल्याने ड्रिफ्ट मिळण्याची संधीही संपली. पहिल्या दिवशी यावर त्याला बळी मिळाले होते.
रवींद्र जडेजा व वाशिंग्टन सुंदर या फिंगर स्पिनर्सचे अपयश भारताला नडले. अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवर ते भेदक ठरत नाहीत, हे याआधीही अनेकदा दिसून आले आहे. दुसरा दिवस फलंदाजांसाठी अनुकूल ठरला. त्यावर ऑफस्पिनर किंवा डावखुरे ऑर्थोडॉक्स स्पिनर्सना टर्न किंवा बाऊन्स अजिबात मिळाला नाही. फलंदाजांना ते फटके मारण्यासाठी घाई करण्यास भाग पाडत होते. पण खेळपट्टीची साथ नसल्याने फलंदाज व्यवस्थित डिफेंड करीत होते. वेगवान गोलंदाज बुमराह तेवढाच प्रभावी वाटत होता. दुसऱ्या सत्रात त्याने काही वेळ रिव्हर्स स्विंगही केले.
पहिले सत्र मुथुसामी व व्हेरेन यांनी खेळून काढल्यानंतर दुसऱ्या सत्रात ते सहजतेने तर काही वेळा आक्रमक खेळू लागले. आता भारतीय फलंदाजही वातावरणाचा लाभ घेत साडेचारशेहून अधिक धावा जमवतील अशी अपेक्षा करावी लागेल. भारतात प्रतिस्पर्ध्याने 450 हून अधिक धावा करूनही यापूर्वी 2016 मध्ये सामना गमविलेला आहे. त्यावेळी चेन्नई कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 477 धावा जमविल्या होत्या. करुण नायरने त्यावेळी भारतातर्फे त्रिशतक नेंदवले होते. पण दुसऱ्या डावात जडेजाने 7 बळी घेत इंग्लंडचा धुव्वा उडवित भारताला सामना जिंकून दिला होता. खेळपट्टीस काही प्रमाणात तडे गेल्यास जडेजाकडून त्या कामगिरीची पुनरावृत्ती होऊ शकेल. येथे कुलदीपने सर्वाधिक 4 बळी टिपले तर बुमराहृ सिराज, जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका प.डाव 151.1 षटकांत सर्व बाद 489 : मार्करम, 38, रिकेल्टन 35, स्टब्स 49, बवुमा 41, झोर्झी 28, मुल्डर 13, मुथुसामी 206 चेंडूत 10 चौकार, 2 षटकारांसह 109, व्हेरेन 45, मार्को जॅन्सेन 91 चेंडूत 6 चौकार, 7 षटकारांसह 93, हार्मर 5, केशव महाराज नाबाद 12, अवांतर 21. कुलदीप यादव 4-115, बुमराह 2-75, सिराज 2-106, जडेजा 2-94.
भारत प.डाव 6.1 षटकांत बिनबाद 9 : जैस्वाल खेळत आहे 7, केएल राहुल खेळत आहे 2.