82 हजाराची पातळी गाठणार सेन्सेक्स?
रेंटिग एजन्सी मूडिजचा अंदाज : स्थिर सरकारवर गुंतवणूकदारांचा विश्वास
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजार सध्या तेजीच्या दिशेने वाटचाल करत असून आगामी काळामध्ये मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 82 हजारांची पातळी गाठू शकतो, असा अंदाज आंतरराष्ट्रीय रेटींग एजन्सी मूडिज यांनी व्यक्त केला आहे.
शेअर बाजार दररोज नवी उच्चांकी पातळी गाठण्याचा प्रयत्न करतो आहे. अलीकडच्या सत्रांमध्ये सेन्सेक्स निर्देशांकाने 77 हजारांची विक्रमी पातळी ओलांडलेली आहे. याचप्रमाणे निफ्टी निर्देशांकसुद्धा 23500 अंकांच्या जवळपास पोहोचला आहे. या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या रेटींग एजन्सीज मूडिजने सेन्सेक्स निर्देशांकाच्या पुढील वाटचालीबाबत चांगले भाकीत केले आहे.
कधी गाठणार पातळी
सेन्सेक्स निर्देशांक पुढील 12 महिन्यांमध्ये 14 टक्के इतका वाढू शकतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा आल्याने बाजारामध्ये तेजी कायम राहिली आहे. सरकारमध्ये स्थिरता असून त्याचप्रमाणे महागाईवरदेखील नियंत्रण ठेवले जात असून, आगामी दिवसांमध्ये बाजारामध्ये तेजीचा कल कायम राहू शकतो. 2025-26 पर्यंत कंपन्यांचे उत्पन्न आधीपेक्षा चांगले वाढलेले पहायला मिळणार आहे. याचा परिणाम बाजारामध्ये 500 अंकांची वाढ होणार असे मानले जात आहे. 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 82 हजारांची सर्वोच्च पातळी गाठू शकतो, असा अंदाज संस्थेने मांडला आहे.
महत्त्वाच्या सुधारणा अपेक्षीत
सरकार स्थिर असून आगामी काळात नव्या सुधारणांची भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदी 3.0 अंतर्गत स्थापन झालेल्या सरकारमुळे पुढील पाच वर्षात चांगले बदल अनुभवायला मिळणार आहेत, असेही मुडिजला वाटते. पुढील महिन्यात अर्थमंत्री संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अंतर्गत पायाभूत सुविधांवर सरकारचा भर असणार आहे. संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, ऐरोस्पेस, नवीकरणीय ऊर्जा, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर घरांची उभारणी यांना प्राधान्य मिळणार आहे. परिणामी भारताचा हा सर्वात दीर्घ आणि मजबूत तेजीत राहणारा शेअरबाजार असणार आहे. गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक करत राहण्याचा सल्ला मूडिजने व्यक्त केला आहे.
भारतीय शेअर बाजार चौथ्या स्थानावर
नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराने भांडवल वृद्धीत वाढ करत जागतिक स्तरावर क्रमवारीत हॉंगकॉंगला मागे टाकण्यामध्ये यश मिळवले आहे. या प्रकारे भारत आता जागतिक स्तरावर शेअर बाजारामध्ये चौथ्या स्थानावर आला आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शेअरबाजार मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिला होता. मात्र त्यानंतर शेअर बाजारात सुधारणा होत गेली. रालोआचे सरकार आले तरी गुंतवणूकदारांनी शेअरबाजारावर विश्वास ठेवला. याबाबतीत भारतीय शेअर बाजाराचे भांडवल मूल्य दहा टक्के वाढत 5.2 लाख कोटी डॉलरवर पोहोचले. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 435 लाख कोटींवर पोहोचले होते. या तुलनेमध्ये पाहता हाँगकाँग बाजाराचे मूल्य 5.17 लाख कोटी डॉलरवर होते. भारताने हॉंगकॉंगला या आधी याच वर्षी जानेवारीमध्ये मागे टाकले होते. त्या वेळेला दोन्ही बाजारांमध्ये बाजार मूल्यामध्ये चढ-उतार दिसून आला होता.