डिसेंबर 2024 पर्यंत सेन्सेक्स पोहचणार 74 हजारावर....
मुंबई :
भारतीय शेअर बाजार हा इतर देशांच्या बाजारांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत असला तरी पुढील वर्षी लोकसभा निवडणूक काळादरम्यान बाजारात घसरणीचा कल राहणार असून डिसेंबर 2024 पर्यंत मात्र सेन्सेक्स निर्देशांक 74 हजाराची पातळी गाठेल, असा विश्वास मॉर्गन स्टॅन्ले यांनी व्यक्त केला आहे.
सध्याला जागतिक स्तरावर इस्त्रायल हमास युद्धाने पुन्हा वातावरण दुषित झाले असून त्याचा कमी अधिक परिणाम विविध देशांच्या शेअरबाजारावरही दिसून येतो आहे. सध्याला भारतातील शेअरबाजारातील स्थिती काहीशी तेजीत व नंतर पुन्हा घसरणीत राहण्याची शक्यता आहे.
फेडरलच्या निर्णयावर बाजाराची वाटचाल
डिसेंबरमध्ये अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून 30 टक्क्यांची वाढ होण्याबाबतचे संकेत असले तरी ती वाढ होणार नाही, असे म्हटले जात आहे. तेव्हा फेडरलच्या निर्णयावर बाजार आपली पुढची चाल खेळेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच डिसेंबरमध्ये वाढीला ब्रेक लागेल व पुन्हा फेब्रुवारीला पुढील वर्षी फेडरल आपला निर्णय घेऊ शकते, पण तो दिलासा देणारा असण्याची शक्यता आहे. म्हणजे व्याजदर कमी करण्याचा निर्णय सदरच्या फेडरलच्या बैठकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास भारतीय शेअर बाजाराची चाल तेजीकडे झेपावण्याची शक्यता असणार आहे.
मॉर्गन स्टॅन्ले या फर्मच्या मते 3.7 ट्रिलीयनचा भारतीय शेअर बाजार पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काहीसा घसरणीचा राहू शकतो. निवडणुकीतील निकालावर भारतीय शेअरबाजाराची दिशा स्पष्ट होणार असल्याचे मत फर्मने मांडले आहे. निकाल जर एकाच पक्षाच्या बाजुने नाही लागले व बहुमत कोणताच पक्ष मिळवू शकला नाही तर शेअरबाजार 30 टक्के इतका कोसळू शकतो, असा अंदाजही मॉर्गन स्टॅन्लेने व्यक्त केलाय.
तर मात्र गाठणार उद्दिष्ट
भारतीय शेअरबाजार यंदा जवळपास 7 टक्के इतका वाढला आहे. आशिया आणि इतर आघाडीवरच्या बाजारांनाही भारताने मागे टाकले आहे. सध्याला बाजारातील स्थिती अशीच काहीशी चढउताराची राहणार असून निकालात स्पष्ट बहुमत एकाच पक्षाला मिळालं तर शेअरबाजार अपेक्षीत उसळी घेण्याच्या दिशेने आगेकुच करेल. डिसेंबर 2024 पर्यंत बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 74 हजारापर्यंत पोहचू शकतो, असे शेवटी मॉर्गन स्टॅन्ले यांनी म्हटले आहे.