मुहूर्त व्यवहारात सेन्सेक्स 63 अंकांनी वधारला
दिवाळीनिमित्त एक तासाचे विशेष सत्र : निफ्टीतही तेजीची झुळूक
वृत्तसंस्था/ मुंबई
दिवाळीनिमित्त मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी मुहूर्त झाला. यावेळी भारतीय शेअर बाजारातील व्यवहारात सेन्सेक्स 63 अंकांनी वधारून बंद झाला. तर निफ्टीही तेजीसह बंद झाली. यावेळी वाहन, मीडिया आणि आयटी शेअर्स वधारले. पीएसयू बँक आणि रिअल्टी सेक्टरमध्येही सकारात्मक स्थिती राहिली होती. मंगळवारच्या सत्रात विशेष सत्रात सेन्सेक्स 62.97 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 84,426.34 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 25.45 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 25,868.60 वर बंद झाला आहे. साधारणपणे मुहूर्ताचा व्यवहार संध्याकाळी असतो, परंतु यावेळी बाजार दुपारी 1:45 ते 2:45 पर्यंत एका तासासाठी खुला होता.
मुहूर्ताचा व्यवहाराची परंपरा 69 वर्ष जुनी
हिंदू रितीरिवाजांमध्ये, मुहूर्त हा असा काळ आहे. जेव्हा ग्रहांची हालचाल अनुकूल मानली जाते. म्हणून, शेअर बाजारातील गुंतवणूकदार गुंतवणूक सुरू करण्यासाठी या दिवसाला खूप खास मानतात. मागील वर्षीच्या मुहूर्त व्यवहारात सेन्सेक्स 4702 अंकांनी (5.90 टक्क्यांनी) वधारला आहे. त्याच वेळी निफ्टी 1565 अंकांनी (6.44टक्क्यांनी) तेजीत राहिला. 2024 मध्ये, 1 नोव्हेंबर रोजी मुहूर्त व्यवहार झाला होता. त्यानंतर सेन्सेक्स 335 अंकांच्या वाढीसह 79,724 वर बंद झाला. निफ्टी 99 अंकांनी वधारून 24,304 वर बंद झाला होता.
2082 आउटलुक
विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, 2082 हे ई-ग्रोथ किंवा कमाई वाढीचे वर्ष असेल. ज्यामध्ये ऑटोमोबाईल्स, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एनबीएफसी सारख्या क्षेत्रांमध्ये पुनर्प्राप्ती आघाडीवर राहतील. मेहता इक्विटीजचे प्रशांत तापसे म्हणाले की, सरकारच्या 12 लाख कोटींच्या करमुक्त अर्थसंकल्पीय प्रोत्साहन आणि जीएसटी 2.0 सुधारणांना वापर आणि कॉर्पोरेट नफ्यासाठी मजबूत टेलविंड म्हणून सूचित करतात.