अंतिम सत्रात सेन्सेक्स 585 अंकांनी कोसळला
आशियातील घसरणीचा परिणाम : शेवटच्या तासात विक्रीचा दबाव
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये आशियाई बाजारातील घसरणीमुळे शेवटच्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. परंतु बाजाराच्या शेवटच्या तासात विक्रीचा दबाव वाढला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर कर लादल्याने, औषध कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी विक्री झाली.
धातूंच्या समभागांमध्ये घसरण झाल्याने बाजार खाली ओढला गेला. याशिवाय, ट्रम्प यांनी अनेक व्यापारी भागीदारांवर परस्पर कर लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत कमकुवतपणा दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्स 100 अंकांपेक्षा जास्त घसरून 81,074 वर उघडला. व्यापार सत्रादरम्यान निर्देशांकात चढ-उतार दिसून आला मात्र अखेर तो 585.67 अंकांनी घसरून 80,599.91 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील अखेरच्या क्षणी 203.00 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 24,565.35 वर बंद झाला.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, सन फार्माचे शेअर्स सर्वाधिक घसरले. फार्मा शेअर्स सुमारे 4.5 टक्क्यांनी घसरले. अमेरिकेने भारतातून आयातीवर लादलेल्या 25 टक्के शुल्काचा परिणाम फार्मा क्षेत्रावर झाला. याशिवाय, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स हे प्रमुख घसरणीत होते. दुसरीकडे, ट्रेंट लिमिटेडचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वधारले. यासोबतच, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, कोटक बँक आणि रिलायन्स हे तेजीसह बंद झाले.
निफ्टी मिडकॅप निर्देशांक 1.33 टक्क्यांनी तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 1.66 टक्क्यांनी घसरला. निफ्टी फार्मा निर्देशांक 3.33 टक्क्यांनी सर्वाधिक घसरणीत होता. निफ्टी मेटल निर्देशांकही 1.97 टक्क्यांनी घसरला. निफ्टी आयटी निर्देशांक 1.85 टक्क्यांनी घसरला. मात्र निफ्टी एफएमसीजी वाढला.