चौफेर विक्रीमुळे सेन्सेक्स820 अंकांनी कोसळला
जागतिक वातावरणाचा प्रभाव : सलग तिसरे सत्र घसरणीसोबत बंद
मुंबई :
जागतिक बाजारातील मंदीच्या ट्रेंडमध्ये मंगळवारी भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाला आहे. परकीय गुंतवणूकदारांची सततची होणारी विक्री आणि नकारात्मक तिमाही कामगिरीचे निकाल यामुळे गुंतवणूकदारांनी आपली रक्कम काढून घेण्यास सुरुवात झाल्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स सकाळच्या सत्रात सकारात्मक होत 79,644.95 वर उघडला. मात्र ही तेजी कायम टिकवण्यात सेन्सेक्सला अपयश आले. दिवसअखेर सेन्सेक्स 820.97 अंकांच्या तीव्र घसरणीसह 1.03 टक्क्यांप्रमाणे निर्देशांक 78,675.18 वर बंद झाला. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 257.85 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 23,883.43 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी एनटीपीसीचा शेअर सर्वाधिक घसरणीसह 3.16 टक्क्यांवर बंद झाला. यामध्ये एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, स्टेट बँक, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया, कोटक बँक, अॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, एल अँड टी याशिवाय टेक महिंद्रा आणि आयटीसीचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे, सनफार्मा, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि टीसीएसचे समभाग तेजीत राहिल्याचे दिसून आले तर बाजार भांडवलातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सपाट स्तरावर बंद झाले.
घसरणीचे कारण?
परकीय गुंतवणूकदारांची सतत विक्री आणि जागतिक बाजारातील कमकुवत कल यामुळे सर्वांगीण विक्रीच्या दबावामुळे बाजार आज घसरणीत बंद झाले. गुंतवणूकदार अमेरिकेच्या चिंतेत असल्याने मंगळवारी जागतिक समभागांवर दबाव आला. यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे पूर्व नियोजन करुनच आपली गुंतवणूक करणे हिताचे ठरणार असल्याचे शेअर बाजारातील अभ्यासकांनी यावेळी सांगितले आहे.