अंतिम सत्रातही सेन्सेक्स-निफ्टी तेजीत
आयटीमध्ये खरेदीचा कल : अमेरिकन बाजाराच्या कामगिरीचाही लाभ
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सप्ताहातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. बुधवारच्या मोठ्या घसरणीनंतर गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांच्या सत्रात बाजारात तेजी कायम राहिल्याचे दिसून आले. मुख्य क्षेत्रांची स्थिती पाहिल्यास यात आयटीच्या समभागातील लिलावामुळे व अमेरिकन बाजारातील मजबूत कल यांचा फायदा भारतीय बाजाराला झाल्याचे शुक्रवारी दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 241.86 अंकांनी वधारुन निर्देशांक 71,106.96 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 94.35 अंकांनी वधारुन निर्देशांक 21,349.40 वर स्थिरावला आहे.
व्यापक बाजारातील स्थितीमध्ये बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक 0.74 टक्के आणि 1 टक्के तेजीत राहिले आहेत. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये विप्रोचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासह एचसीएल टेक, टाटा मोर्ट्स, मारुती सुझुकी, टाटा स्टील, इन्फोसिस, टेक महिंद्रा, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि जेएसडब्लू स्टील यांचे निर्देशांक वधारले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये भारतीय स्टेट बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील शुक्रवारची बाजारांची स्थिती पाहताना आशियातील अन्य बाजारात जपानचा निक्की हा तेजीत राहिला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. युरोपातील बाजारात मात्र मिळताजुळता कल राहिला होता. अमेरिकन बाजारामध्ये गुरुवारी सकारात्मक कल राहिला होता. जागतिक बाजारात कच्चे तेल 1.01 टक्क्यांनी वधारुन 80.19 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
आता भारतीय बाजारातील विविध घडमोडींवर लक्ष केंद्रीत करत आगामी आठवड्यातील पहिल्या दिवसापासून गुंतवणूकदारांना आपली रणनीती निश्चित करावी लागणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.