अंतिम सत्रात बाजारात सेन्सेक्स-निफ्टी तेजीत
आशियातील बाजारांच्या संमिश्र स्थितीचा फायदा
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचा कल राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये आशियातील बाजारांमधील सकारात्मक संमिश्र स्थितीचा फायदा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले. अंतिम काही तासांमध्ये झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले. गुरुवारी, दसरा आणि गांधी जयंतीनिमित्त बाजार बंद होता.
बीएसई सेन्सेक्स 80,684.14 वर उघडला. मात्र तो अखेरच्या क्षणी 223.86 अंकांनी वाढून 81,207.17 वर बंद झाला. याप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील अखेर 57.95 अंकांनी वाढून 24,894.25 वर बंद झाला. मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील समभागांत शुक्रवारी टाटा स्टील, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, एल अँड टी आणि भारती एअरटेल हे सर्वाधिक वाढणारे होते. दरम्यान, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा आणि आयसीआयसीआय बँक समभाग घसरणीसोबत बंद झाले.
काही क्षेत्रांची मजबूत कामगिरी
क्षेत्रानुसार, निफ्टी धातू निर्देशांक सर्वाधिक वाढणारा होता, 1.82 टक्क्यांनी वाढला. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्येही 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. निफ्टी बँक, ऊर्जा, वित्तीय सेवा, एफएमसीजी, आयटी, फार्मा व तेल आणि वायू देखील मजबूतीसोबत बंद झाले. दरम्यान, निफ्टी ऑटो, रिअल्टी आणि आरोग्यसेवा क्षेत्रात घसरण झाली.
जागतिक बाजारपेठ
शुक्रवारी आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र वातावरण होते. जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.42 टक्के वाढून व्यवहार करत होता. सप्टेंबरमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 2.6 टक्क्यांवर पोहोचला, जो अपेक्षित 2.4 टक्क्यांपेक्षा चांगला होता. ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स 200 निर्देशांक 0.17 टक्क्यांनी घसरला होता.