सेन्सेक्स-निफ्टी अंतिम सत्रात तेजीसह बंद
जागतिक बाजारात तेजी : अमेरिकन फेडरलच्या निर्णयाकडे लक्ष
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यात अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार सलगच्या तेजीसह बंद झाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरही सकारात्मक संकेत राहिल्याचे दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही वाढ झाली. या वाढीचे एक प्रमुख कारण म्हणजे पुढील आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा बाळगून गुंतवणूकदारांनी विश्वास व्यक्त केला आहे.
याशिवाय, भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या यशाच्या बातम्यांमुळेही बाजाराला चालना मिळाली. सेन्सेक्स 355 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी वाढून 81,904.70 वर बंद झाला. दिवसभरात तो वाढून 81,992.85 वर पोहोचला होता. यावेळी, निफ्टी 108.50 अंकांनी वाढून 25,114.00 वर बंद झाला. सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजारात सकारात्मक तेजी राहिली होती.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, मारुती आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. गुंतवणूकदारांकडून या कंपन्यांना पसंती मिळत आहे. इटर्नल, हिंदुस्थान युनिलिव्हर, ट्रेंट आणि टायटनचे शेअर्स घसरले. बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक स्तरावर सकारात्मक वातावरण आणि भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांमधील प्रगतीमुळे बाजार तेजीत राहू शकतो.
जागतिक बाजारातले चित्र
आशियाई बाजारही संमिश्र राहिले. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई 225 आणि हाँगकाँगचा हँगसेंग सकारात्मक राहिला. परंतु शांघायचा एसएसई कंपोझिट इंडेक्स घसरत बंद झाला. युरोपातील बहुतेक बाजारांमध्ये घसरण दिसून आली. दुसरीकडे, गुरुवारी अमेरिकन बाजारांनी चांगली कामगिरी केली आणि तेजीने बंद झाले. जियोजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, भारतीय बाजार तीन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.