सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा मोठ्या घसरणीत
गुंतवणूकदारांना 8 लाख कोटींचा फटका : विदेशी विक्रीचा परिणाम
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी भारतीय शेअर बाजारातील घसरणीचा सिलसिला कायम राहिला होता. यामध्ये दिवसभरात दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा एकदा मोठ्या तोट्यासह बंद झाले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे ही घसरण नोंदवण्यात आली आहे.
घसरणीमध्ये प्रामुख्याने एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले होते. बीएसई सेन्सेक्स बुधवारी अखेरीस, 984.23 अंकांनी घसरुन 1.25 टक्क्यांसोबत निर्देशांक 77,690.95 वर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये निफ्टी 334.40 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 23,559.05 वर बंद झाला. 46 निफ्टी कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी टाटा स्टील सर्वाधिक 3.40 टक्क्यांनी घसरुन वर बंद झाला. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली.
दुसरीकडे, एनटीपीसीचे समभाग 0.21 टक्क्यांनी वाढून बंद झाले.
घसरणीची 4 प्रमुख कारणे
1.अन्न आणि पेय पदार्थांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई ऑक्टोबरमध्ये 6.2 टक्क्यांवर पोहोचली. 2. देशांतर्गत कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत याचाही परिणाम बाजारात झाला. 3. तिसरे प्रमुख कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांची विक्री, जे भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत व चीनी शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. 4. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम दिसला.