सेन्सेक्सची 1,131 अंकांची उसळी
निफ्टीत 325 अंकांची तेजी : जागतिक पातळीवर सकारात्मक संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी मागील काही दिवसांपासून येत असलेली घसरणीची छाया अखेर मागे सरली आहे. जागतिक व स्थानिक बाजारांमधील समीकरणांमुळे बाजाराला मंगळवारच्या सत्रात बळ मिळाले. दरम्यान या सकारात्मक स्थितीमुळे बाजारमूल्य तब्बल 400 लाख कोटींच्या घरात पोहोचले आहे.
जागतिक बाजारपेठेत तेजी असताना मंगळवारी भारतातील इक्विटी बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 जोरदार वधारून बंद झाले. सलग दुसऱ्यांदा बाजार तेजीच्या लाटेवर बंद झाला. नोव्हेंबरमध्ये सुधारणा झाल्यानंतर बाजार तळाशी आला आहे, या आशेने गुंतवणूकदारांनी स्वस्त समभाग खरेदी केले. वाहन, धातू आणि रियल्टी क्षेत्रातील समभागांमधील जोरदार खरेदीमुळे बाजाराने तेजीची उंची प्राप्त केली आहे. बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1131.31 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 1.53 टक्क्यांसह 75,301.26 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 325.55 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 22,834.30 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये मंगळवारी झोमॅटोचे समभाग हे 7 टक्केपेक्षा जास्त वाढले. तर आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि अदानी पोर्ट्स हे देखील तेजीसह बंद झाले आहेत.
बाजारात मजबूत स्थिती का राहिली?
1.वाजवी मूल्यांकनामुळे देशांतर्गत शेअरबाजारात खरेदीचा कल राहिला. विशेषत: अलिकडे लार्जकॅप समभागांमध्ये चांगली खरेदी दिसून आली.
2.याशिवाय आर्थिक परिस्थितीमुळे आर्थिक वर्ष 2024-25 च्या शेवटच्या तिमाहीत कॉर्पोरेट उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा वाढली आहे.
3.चलनवाढ रिझर्व्ह बँकेच्या 4 टक्क्यांच्या लक्ष्य पातळीपेक्षा खाली आल्याने, मध्यवर्ती बँक विकासाला पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करू शकते आणि बेंचमार्क धोरण दरांमध्ये लक्षणीय कपात करू शकते अशी अपेक्षा वाढली आहे.
4.मंगळवारी रुपयाने तीन आठवड्यांहून अधिक काळातील सर्वोच्च पातळी गाठली. डॉलरमधील सततच्या कमकुवतपणामुळे रुपया मजबूत झाला, जो त्याच्या प्रमुख समकक्षांच्या तुलनेत जवळजवळ पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
पुन्हा एकदा बाजारमूल्य मजबूत
बाजारात सलग दोन सत्रांनंतर बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 400 लाख कोटी रुपयांच्यापलीकडे गेले आहे.
जागतिक बाजारपेठेतून कोणते संकेत आहेत?
अमेरिकेतील किरकोळ विक्रीच्या चांगल्या आकडेवारीमुळे मंगळवारी जागतिक बाजारपेठा तेजीच्या दिशेने व्यवहार करत आहेत. आशियामध्ये, जपानचा निक्केई 1.4 टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.51 टक्के वधारला.