सेन्सेक्स 75 अंकांच्या तेजीसोबत बंद
अदानी एंटरप्राइजेसचे समभाग 3 टक्क्यांनी वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 74.61 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. यावेळी निफ्टीही तेजीसोबत बंद झाला आहे. यामध्ये मंगळवारी पीएसयू बँक आणि ऊर्जा क्षेत्रातील समभाग मजबूत राहिल्याचा फायदा हा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 74.61 अंकांनी वधारुन निर्देशांक 60,130.71 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 25.85 अंकांनी वाढून निर्देशांक 17,769.25 वर बंद झाला आहे. या कामगिरीसोबत देशातील भांडवली बाजार सलग चौथ्या सत्रात तेजीच्या प्रवासासोबत बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमध्ये मंगळवारच्या सत्रात ऊर्जा आणि पीएसयू बँक यांचे निर्देशांक प्रामुख्याने वधारुन बंद झाले आहेत. यावेळी धातू, इन्फ्रा, ऑईल अॅण्ड गॅस तसेच रियल्टी यांचे निर्देशांक 0.5 ते 0.5 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. एनएसईमध्ये अदानी एंटरप्राइजेसचे समभाग सर्वाधिक 2.54 टक्क्यांनी वधारत बंद झाले असून यासोबत बजाज फायनान्स 2.38, ब्रिटानिया 2.30, बजाज फिनसर्व्ह 1.99 टक्के आणि भारती एअरटेलचे समभाग हे 1.64 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये निफ्टीत एचडीएफसी लाईफ 3.43 टक्क्यांनी नुकसानीत राहिला आहे. यासह युपीएल 1.96, एचडीएफसी बँक1.45, एचडीएफसी 1.17 आणि टेक महिंद्रा यांचे समभाग हे 0.81 टक्क्यांनी प्रभावीत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
रुपयाची स्थिती
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी प्रभावीत होत 81.91 वर बंद झाला आहे. यामध्ये मागील सत्रात रुपया 81.91 वर बंद झाला होता.
अभ्यासकांच्या नजरेतून....
जागतिक बाजारातील स्थितीमध्ये मंगळवारी जागतिक स्थिती नकारात्मकता दिसून आली. त्याचा प्रभाव म्हणून की काय देशातील शेअर बाजाराचा ट्रेंड बदलत जात मंगळवारी शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले होते.