सेन्सेक्स पुन्हा 80 हजारांच्या शिखरावर
सेन्सेक्स 391 तर निफ्टी 112 अंकांनी मजबूत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात सलग दोन दिवस सुस्ती राहिल्यानंतर पुन्हा एकदा सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांत भक्कम तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने मंगळवारी वाहन व एफएमसीजी क्षेत्रांमधील समभागांची तेजी व विदेशी गुंतवणूकदारांची कामगिरी या कारणास्तव सेन्सेक्सने पुन्हा 80 हजारांचे शिखर सर केले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 391.26 अंकांच्या तेजीसोबत 0.49 टक्क्यांसह निर्देशांक 80,351.64 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 112.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 24,433.20 वर बंद झाला आहे.
मंगळवारच्या सत्रात ट्रेडिंगच्या दरम्यान सेन्सेक्स 30 समभागांमधील 18 समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून नोंदणी शुल्क माफ करण्यात आल्याच्या निर्णयामुळे वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये तेजी होती. मारुती सुझुकीचे समभाग हे तब्बल 6 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारले आहेत. या दरम्यान मारुतीसह महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयटीसी, टायटन आणि सनफार्मा यांचे समभाग तेजीत राहिले होते. तर नेस्ले इंडिया, टाटा मोर्ट्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक, टीसीएस, एशियन पेन्ट्स, पॉवरग्रिड कॉर्प, अदानी पोर्टस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीत होते. अन्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि इन्फोसिस यांचे समभाग हे पहिल्या पाचमध्ये घसरणीत राहिले. तसेच टाटा स्टील, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, एनटीपीसी, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. जागतिक बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले होते. यासह एफएमसीजी आणि वाहन यासारख्या क्षेत्रांमधील नफाकमाईमुळे व मान्सून व खरीप याच्या कामगिरीच्या सकारात्मक स्थितीमुळे बाजारात भक्कम स्थिती राहिली आहे.