तरुणचा सनसनाटी विजय, लक्ष्य सेनसह आगेकूच
मकाव ओपन बॅडमिंटन : आयुष शेट्टी, रक्षिता, ध्रुव-तनिषा पराभूत
वृत्तसंस्था/मकाव
भारताचा बॅडमिंटनपटू तरुण मन्नेपल्लीने हाँगकाँगच्या अग्रमानांकित ली चेउक यियूला पराभवाचा धक्का देत सनसनाटी निर्माण केली. येथे सुरू असलेल्या मकाव ओपन सुपर 300 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने प्रवेश मिळविला. तसेच त्याचाच सहकारी लक्ष्य सेननेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तरुण मन्नेपल्लीने जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱ्या लीविरुद्ध एका गेमची पिछाडी भरून काढत 19-21, 21-14, 22-20 असा विजय मिळविला. एक तासाहून अधिक काळ ही लढत रंगली होती. 23 वर्षीय तरुण हा जागतिक क्रमवारीत 47 व्या स्थानावर आहे. सुपर 300 स्पर्धेत दुसऱ्यांदा त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. याआधी फेब्रुवारीत जर्मन ओपन स्पर्धेतही त्याने ही मजल मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत त्याची लढत चीनचा हु झे अॅनशी होईल.