तरुणचा सनसनाटी विजय, लक्ष्य सेनसह आगेकूच
मकाव ओपन बॅडमिंटन : आयुष शेट्टी, रक्षिता, ध्रुव-तनिषा पराभूत
वृत्तसंस्था/मकाव
भारताचा बॅडमिंटनपटू तरुण मन्नेपल्लीने हाँगकाँगच्या अग्रमानांकित ली चेउक यियूला पराभवाचा धक्का देत सनसनाटी निर्माण केली. येथे सुरू असलेल्या मकाव ओपन सुपर 300 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने प्रवेश मिळविला. तसेच त्याचाच सहकारी लक्ष्य सेननेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तरुण मन्नेपल्लीने जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱ्या लीविरुद्ध एका गेमची पिछाडी भरून काढत 19-21, 21-14, 22-20 असा विजय मिळविला. एक तासाहून अधिक काळ ही लढत रंगली होती. 23 वर्षीय तरुण हा जागतिक क्रमवारीत 47 व्या स्थानावर आहे. सुपर 300 स्पर्धेत दुसऱ्यांदा त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. याआधी फेब्रुवारीत जर्मन ओपन स्पर्धेतही त्याने ही मजल मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत त्याची लढत चीनचा हु झे अॅनशी होईल.
अन्य सामन्यात लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या चिको ऑरा ड्वि वार्डोयोचा 21-14, 14-21, 21-17 असा पराभव केला. आयुष शेट्टीचे आव्हान मात्र संपुष्टात आले. त्याला मलेशियाच्या जस्टिन होहने 21-18, 21-16 असे हरविले. महिला एकेरीत भारताच्या रक्षिता रामराजलाही थायलंडच्या ओ. बुसाननकडून 21-14, 10-21, 11-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत पाचव्या मानांकित भारताच्या ध्रुव कपिला व तनिषा क्रॅस्टो यांना मलेशियाच्या जिमी वाँग व लइ पेइ जिंग यांच्याकडून 21-19, 13-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत पृथ्वी रॉय व के. साई प्रतीक यांनाही चौथ्या मानांकित मलेशियाच्या जुनैदी अरिफ व रॉय किंग याप यांनी 21-18, 21-18 असे हरविले.