वेडं होऊन वाचा ; वाचनाशिवाय तरणोपाय नाही !
पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरांनी दिला विद्यार्थांना सल्ला
सावंतवाडी । प्रतिनिधी
विद्यार्थांनी स्वप्न पाहुन ती पुर्ण करण्यासाठी कष्ट, मेहनत घेतली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे केले. यशवंतराव भोसले नॉलेज सिटी मध्ये आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. जयु भटकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर गरिबांच्या कल्याणासाठी केला पाहिजे असेही ते म्हणाले. व्यासपीठावर यशवंतराव भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत- सावंत भोसले, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यावर पुस्तक लिहिणारे सागर देशपांडे उपस्थित होते .
आता तंत्रज्ञान प्रगत झाले आहे.मात्र, अजूनही इंडिया आणि भारत यात मोठी दरी आहे. त्याचे दर्शन कोरोनात झाले . एका ठिकाणी माझ्या मित्राचा आठ वर्षाचा नातू गुगल वर विविध माहिती मिळवून तो मी विचारलेल्या प्रश्नांना सहजपणे उत्तर देतो तर दुसऱ्या बाजूला सातारा येथे इंटरनेट नसल्याने अभ्यास बुडतो म्हणून शाळकरी मुलगी आत्महत्या करतो हे चित्र भारत आणि इंडियातील दूरी स्पष्ट करणारे आहे. इंडिया आणि भारत यामधील दुरी मिटवली पाहिजे. आजही 70 टक्के भारतीय खेडेगावात राहत आहेत. त्यांच्या जीवनात प्रगती आणली पाहिजे. त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .
देशात सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, असे माझे मत आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात बुद्धिमत्ता आहे. या बुद्धिमत्तेचा वापर इतर देशांपेक्षा आपल्या देशातील प्रगतीसाठी केला पाहिजे. आपल्या देशातही अनेक संशोधक आहेत. ते विविध क्षेत्रात संशोधन करत आहेत. आपल्याला खोकला, सर्दी झाली तरी ती कशामुळे झाली, आपल्यात किती हिमोग्लोबिन आहे, न्यूट्रिशन किती आहे, हे स्मार्टफोनमध्ये कळू शकते. याचा शोध सिलिकॉन व्हॅलीमधील नाहीतर आपल्या देशातील तरुणांनी लावला आहे. असे माशेलकर म्हणाले. विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. पुस्तकाच्या वाचनातूनच आपल्याला ज्ञान मिळते . पुस्तकाला आपण गुरु मानले पाहिजे. आजच्या काळात वाचन कमी झाले आहे. मात्र आपण वेडे होऊन वाचन केले पाहिजे. डिजिटलच्या जमान्यात आता ऑडिओ पुस्तके आली आहेत. त्याचा वापर करून आपल्या ज्ञानात भर पाडली पाहिजे. याशिवाय लेखन, वक्तृत्व या कला अवगत केल्या पाहिजेत. त्याचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी होऊ शकतो . आपल्या देशात परंपरागत ज्ञान ,मूल्ये आहेत. त्याची जपणूक आपण केली पाहिजे. आयुर्वेदिक ज्ञान हे त्यापैकीच आहे. आपल्या देशात परंपरागत ज्ञानाच्या आधारे हळदीचा औषधी गुणधर्म म्हणून आपण वापर केला होता. परंतु यात हळदीचा पेटंट अमेरिकेने घेतला. यासंदर्भात आपल्याला लढाई लढावी लागली. आपल्या परंपरागत ज्ञानासंदर्भात आपण जागृत राहिले पाहिजे. त्यासंदर्भातील आवश्यक बाबींचे संशोधन झाले पाहिजे. जेणेकरून या ज्ञानाचा पेटंट इतर देश घेऊ शकणार नाहीत. आपला देश हंगर इंडेक्स मध्ये खाली आहे . यासंदर्भात आपण विचार केला पाहिजे. प्रगती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे माशेलकर यांनी स्पष्ट केले. यावेळी माशेलकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत. आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन केले माशेलकर यांनी आपल्या प्रकट मुलाखतीत आपल्या जीवनात आई ,पत्नी ,गुरू, पुस्तके यांनी कशी साथ दिली त्यांच्यामुळे मी कसा घडत गेलो याचे विवेचन केले.