मांगुर फाट्यावर एक मार्ग बंद
येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मांगुर फाट्यावर पाणी आल्याने महामार्गाच्या एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसऱ्या मार्गाने दोन्ही बाजूची वाहने वळवण्यात आली असून या मार्गावरून सुरळीत वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी सकाळी मांगुर फाटा येथे बाजूच्या शेतातील पाणी तसेच नदीचे पाणी काही प्रमाणात फाट्यावर आले होते. यावेळी रस्त्याच्या बाजूला जेसीबीद्वारे मोठे नळे घालून यातून पाणी काढण्यात आले होते. यानंतर वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत वाढ होऊन पुन्हा शुक्रवारी सायंकाळी पाणी फाट्यापर्यंत आले.
त्यामुळे येथून निपाणीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. अशावेळी सीपीआय बी.एस. तळवार तसेच महामार्ग कंत्राटदार अवताडे कंपनीचे व्यवस्थापक विजय दाइंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तसेच महामार्ग प्रशासनाने वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केली. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून महामार्गावर एका बाजूने वाहतूक सुरू आहे. मांगुर फाट्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याच्या अफवा असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.