ज्येष्ठ कामगार नेते, सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ कामगार नेते, विचारवंत, लेखक व सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे (वय 96) यांचे सोमवार दि. 13 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे. कॉ. कृष्णा मेणसे यांची अंत्ययात्रा रात्री 8 वाजता सरस्वतीनगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघाली व सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी समाजातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते. कॉ. कृष्णा मेणसे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1928 रोजी झाला. त्यांचे शिक्षणही बेळगावमध्ये झाले. सत्यशोधक विचारांच्या शिक्षकांचा प्रभाव त्यांच्यावर झाला. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. याचकाळात बेळगावमध्ये भूमिगत राहण्यासाठी येणाऱ्या प्रतिसरकार चळवळीतील अनेकांना त्यांनी आश्रय दिला. याकाळात क्रांतीसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, बर्डे गुरुजी, जी. डी. बापू लाड यांचा त्यांच्याशी परिचय झाला. म. गांधींनी दिलेल्या आदेशाला प्रतिसाद देत 1946 मध्ये शिक्षण सोडून ते थेट महात्मा गांधी यांच्या आश्रमात दाखल झाले. परंतु, गांधी आणि विनोबा यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा त्यांनी शिक्षण सुरू केले. एक उत्तम कुस्तीपटू म्हणूनही त्यांचा लौकिक होता.
विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. बेरड समाजाला शेतीसाठी जमिनीची मागणी त्यांनी केली. तसेच वारांगनांची संघटना बांधली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी 10 ऑक्टोबर 1955 रोजी मुंबईत झालेल्या सत्याग्रहात बेळगावचे प्रतिनिधित्व करून स्वत:ला अटक करून घेतली. त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. तेथेच आचार्य अत्रे, मधु दंडवते, सेनापती बापट यांच्याशी त्यांचा परिचय झाला. बेळगावमध्ये सीमाआंदोलन सुरू झाले. 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलनास सुरुवात झाली. बेळगावमध्ये गोळीबार होऊन चार जणांना हौतात्म्य लाभले. या लढ्याचे नेतृत्व त्यांनी केले. यामुळे केंद्र सरकारने त्यांना भारतातील निरनिराळ्या सात तुरुंगांमध्ये अकरा महिने डांबले.
सीमाआंदोलनाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी झालेल्या साराबंदी आंदोलनाचे संघटक म्हणून त्यांनी काम केले. पोलिसांनी जेव्हा शेतकऱ्यांच्या घरावर जप्तीचे वॉरंट आणले, तेव्हा त्यांनी येळ्ळूर येथे भाई उद्धवराव पाटील यांच्यासोबत सत्याग्रह केला. पोलिसांनी त्यांना भीषण मारहाण केली व तुरुंगात ठेवले. 72 सालापर्यंत सीमाप्रश्नासाठी झालेल्या सर्व आंदोलनात त्यांचा सहभाग होता. याशिवाय गोवामुक्ती आंदोलनातही ते सक्रिय होते. असंघटित व संघटित कामगारांना न्याय मिळण्यासाठी कामगार चळवळीतही ते सक्रिय झाले. हॉटेल कामगार, विणकर, रिक्षाचालक, हमाल, कारखान्यातील कामगार यांच्या लढ्याचे नेतृत्व त्यांनी केले. कर्नाटकातील खाण उद्योगातील कामगारांसाठीही त्यांनी लढा दिला. कम्युनिस्ट चळवळीचे ते पूर्णवेळ कार्यकर्ता होते. या पक्षाच्या राज्य मध्यवर्ती समितीचे चिटणीस व राष्ट्रीय समितीचे सभासद म्हणूनही त्यांनी काम केले.
‘हेमंत’ हे मासिक त्यांनी सुरू केले व त्यानंतर 1969 मध्ये ‘साम्यवादी’ साप्ताहिक सुरू केले. हे आजही सुरू आहे. कृष्णा मेणसे यांनी जवळजवळ 18 हून अधिक पुस्तके लिहिली असून 30 हून अधिक पुरस्कारांचे ते मानकरी होते. 1 मे 1988 रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्राr जोशी यांच्या हस्ते त्यांचा षष्ट्याब्दीनिमित्त गौरव झाला. यावेळी देण्यात आलेला 1 लाख 30 हजार रुपयांचा निधी त्यांनी प्रबोधन कार्यासाठी परत केला. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे. सदाशिवनगर स्मशानभूमी येथे म. ए. समितीतर्फे मालोजीराव अष्टेकर, कोल्हापूर कम्युनिस्ट पक्षातर्फे दिलीप पवार व नागेश सातेरी यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. कोणतेही विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले.