ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांचे निधन
गेली अनेक वर्षे कर्करोगाशी झुंज देत होते झुंजार पत्रकार,समाजसेवी कार्यानेही उमटवला स्वत:चा वेगळा ठसा
डिचोली : गोवा मुक्तिनंतर गेली सुमारे 52 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आपला वैशिष्ट्यापूर्ण ठसा उमटवलेले ज्येष्ठ पत्रकार सुरेश रामकृष्ण वाळवे यांचे वयाच्या 76 व्या वर्षी काल सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी दु. 2 वा. च्या सुमारास त्यांच्या व्हाळशी डिचोली येथील निवासस्थानी दु:खद निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल 100 च्या वर किमो थेरपी उपचार घेऊनही त्यांनी या असाध्य रोगाविरूद्ध आपली झुंज कायम ठेवत अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे ते घरीच असायचे. या आजाराचा सामना करत असतानाच त्यांची काल सोमवारी प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकार क्षेत्रातील तसेच सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले सुरेश वाळवे यांनी ‘राष्ट्रमत’ दैनिकातून आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला होता. त्यानंतर दैनिक नवप्रभाचे संपादक म्हणून अनेक वर्षे काम केले. ज्येष्ठ पत्रकार म्हणून देशातील काही पंतप्रधानांच्या बरोबरही त्यांनी परदेश दौरे केले होते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे मीडिया सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांचे ‘सरळवाट’ हे आत्मचरित्र सत्याने जाणाऱ्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक तसेच प्रेरणादायी आहे.
व्हाळशीत राबविले सामाजिक उपक्रम
व्हाळशी डिचोली येथील या आपल्या जन्मगावी त्यांनी अनेक सेवाभावी प्रकल्प राबविताना वाळवे सभागृह, वाळवे विसावा बस प्रवासी निवारा शेड, व्हाळशी येथील सर्कलमध्ये भव्य पेन साकारून या सर्कलला नवीन ओळख प्राप्त करून दिली आहे. व्हाळशी गावात ते ‘दाजी’ या नावाने प्रसिद्ध होते.
गोव्यासह राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी
वाळवे यांना गोव्यातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. डिचोली बचाव अभियानतर्फे भतग्राम महोत्सवात ‘भतग्राम भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून ती बरीच प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे अग्रलेख हे सर्वत्र वाचले जायचे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दु:ख व्यक्त केले आहे. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनीही वाळवे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी श्रद्धांजली वाहिली. पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामाजिक, शिक्षण व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच व्हाळशी गावातील ग्रामस्थांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. सायंकाळी उशिरा पाजवाडा डिचोली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
डिचोली पत्रकार संघातर्फे श्रध्दांजली
डिचोली पत्रकार संघातर्फे वाळवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला व श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरेश वाळवे यांचे पत्रकारितेतील योगदान हे मोठे व प्रेरणादायी होते. त्यांचे डिचोलीतील पत्रकारांना सदैव मार्गदर्शन असायचे. त्यांच्या जाण्याने पत्रकारांचा मार्गदर्शक हरपल्याची प्रतिक्रिया पत्रकार संघाचे अध्यक्ष विशांत वझे यांनी व्यक्त केली.