समाजात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हावा!
आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन : जिल्ह्यात 7 लाख 84 हजार ज्येष्ठ नागरिक : वृद्धांच्या योगदानावर प्रकाश
बेळगाव : समाजातील वृद्ध लोकांचे कल्याण आणि त्यांचा सन्मान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे समाजातील योगदान, अनुभव व मार्गदर्शन सर्वांसाठी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. हा दिवस मानवी समाजातील वृद्ध लोकांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. जिल्ह्यात एकूण 7 लाख 84 हजार 198 ज्येष्ठ नागरिक असून 3 लाख 73 हजार 181 पुरुष, 4 लाख 11 हजार 2 महिला तर 15 तृतीयपंथीय 15 ज्येष्ठ नागरिक आहेत.
जिल्ह्यात शेकडो शतायुषी ज्येष्ठ नागरिक असून 100 ते 109 वयोगटात 498 यामध्ये पुरुष 153 व महिला 345, 110 ते 119 वयोगटात 2 महिला तर 120 हून अधिक वयोगटात 2 पुरुषांचा समावेश आहे. बेळगाव तालुक्यात 100 ते 109 वयोगटात 30 शतायुषी ज्येष्ठ नागरिक असून जिह्यात सर्वाधित कुडचीत 55 आहेत. 110 ते 120 वयोगटात रायबाग 2 तर कित्तूरमध्ये 2 शतायुषी ज्येष्ठ नागरिक आहेत. जिल्ह्यात एकूण 502 शतायुषी ज्येष्ठ नागरिक आहेत.
यंदा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘स्थानिक आणि जागतिक कृती घडवून आणणारे वृद्ध व्यक्ती : आपल्या आकांक्षा, आपले कल्याण, आपले हक्क’ अशी थीम ठेवण्यात आली आहे. राज्य व केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही समस्या हाऊ नयेत, यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. वृद्धाप आल्यानंतर शरीर थकलेले असते, यामुळे सोपे कामही अवघड बनते. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रसंगी त्यांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. यामुळे सरकारच्या माध्यमातून विविध पेन्शन योजना, स्वयंसेवी संघांच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व स्तरावर कार्य करण्यत येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविण्याच्यादृष्टीने स्वयंसेवा संस्थांच्या माध्यमातून कुशल विकास केंद्र चालविण्यात येत आहे. ज्येष्ठांमधील संसाधन शक्तीचा वापर करून त्यांचा आत्मविश्वास वाढविला जात आहे. 60 वर्षांवरील बेघर असलेल्या ज्येष्ठांना आधार देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारमार्फत जिह्यात 4 वृद्धाश्रम चालविले जात आहेत, जेणेकरून त्यांना निवारा, वैद्यकीय सुविधा व मनोरंजनात्मक वातावरण निर्माण करून त्यांचे जीवनमान उंचावण्यात येत आहे.
तसेच ज्येष्ठांना आपल्या समस्या मांडण्यासाठी हेल्पलाईन सेवाही सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांना परिवहन मंडळाकडून प्रवासास 25 टक्के सूट देण्यात आली आहे. पालक, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, देखभाल कल्याण कायदा 2007 अंतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात न्यायीक मंडळ स्थापन करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जात आहे. महसूल विभागामार्फत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाप पेन्शन योजनेंतर्गत मासिक 800 तर संध्या सुरक्षा योजनेंतर्गत 1200 रु. भत्ता देण्यात येत आहे.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण बैठक घेण्यात येत असून ज्येष्ठांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्यावतीने जिल्ह्यात एक वृद्धाश्रम चालविण्यात येत आहे. त्याचबरोबर केंद्राकडून राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अलिस्को संस्थेच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. तसेच ज्येष्ठांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक उपकरणांचे वाटप केले जात आहे. व्हीलचेअर, चष्मा, चालण्यासाठी काठी, दंत संच, श्रवण यंत्र, कमोड चेअर, वॉकर आदी उपकरणे देण्यात येत आहेत.