बसपचे मातब्बर नेते गुड्डू जमाली यांचा सप प्रवेश
अखिलेश यादव यांच्या प्रयत्नांना यश
वृत्तसंस्था/ लखनौ
बसपचे मातब्बर नेते शाह आलम उर्फ गुड्डू जमाली यांनी बुधवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. सप प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. समाजवादी पक्षाकडून गुड्डू जमाली यांना विधान परिषदेवर पाठविले जाणार असल्याची चर्चा आहे. गुड्डू जमाली यांच्या पक्षप्रवेशामुळे आझगमढ लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाची स्थिती मजबूत होणार आहे.
अखिलेश यादव यांनी राजीनामा दिल्यामुळे आझमगढ मतदारसंघ रिक्त झाला होता. येथे झालेल्या पोटनिवडणुकीत गुड्डू जमाली यांच्यामुळे समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. 2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बसप उमेदवार राहिलेले गुड्डू जमाली यांनी 2.66 लाखाहून अधिक मते मिळविली होती. याचमुळे सप उमेदवार धर्मेंद्र यादव यांना पराभव पत्करावा लागला होता.
गुड्डू जमाली हे दीर्घकाळापासून समाजवादी पक्षाच्या संपर्कात होते. 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीत गुड्डू जमाली यांनी बसपच्या तिकिटावर विजय मिळविला होता.
आगामी लोकसभा निवडणुकीत आझमगढ मतदारसंघात अखिलेश यादव किंवा धर्मेंद्र हे सप उमेदवार असतील असे मानले जात आहे. अशा स्थितीत गुड्डू जमाली यांच्या सपप्रवेशामुळे पक्षनेतृत्वाची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. पसमांदा मुस्लीम समुदायाशी संबंधित असलेल्या गुड्डू यांना विधान परिषदेवर पाठविण्याचा निर्णय अखिलेश घेऊ शकतात.