सिद्धूला उच्च न्यायालयाचा दिलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
माजी क्रीकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याला दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या एका प्रकरणात दिलासा दिला आहे. सिद्धूच्या पत्नीला कर्करोग झाला असून तो चौथ्या टप्प्यात पोहचला आहे. मात्र, काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीजन्य औषधांमुळे आपल्या पत्नीला लाभ झाला आहे, असे मतप्रदर्शन सिद्धू याने काही काळापूर्वी केले होते. या मतप्रदर्शनामुळे समाजाची आणि कर्करोगाच्या रुग्णांची दिशाभूल होत आहे, असा आक्षेप घेणारी याचिका त्याच्या विरोधात सादर करण्यात आली होती. ही याचिका सादर करुन घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सिद्धू याने हे औषध कर्करोगाच्या रुग्णांनी घ्यावे, अशी सूचना केली नव्हती. त्याने केवळ त्याचे मत व्यक्त केले होते. या मतप्रदर्शनामुळे तो लोकांची दिशाभूल करीत आहे, असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने याचिका नाकारली.```````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````