जेएनयूमधील पॅलेस्टाइनविषयक चर्चासत्र रद्द
इराण, पॅलेस्टाइन, लेबनॉनचे राजदूत घेणार होते भाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात होणारे तीन दिवसीय चर्चासत्र रद्द करण्यात आले आहे. हे चर्चासत्र पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर आधारित होते, ज्यात इराण, पॅलेस्टिनी आणि लेबनॉनच्या राजदूतांना संबोधनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. हे चर्चासत्र जेएनयूच्या सेंटर फॉर वेस्ट एशियन स्टडीजकडुन आयोजित केले जाणार होते, परंतु अपरिहार्य कारणांमुळे ते रद्द करण्यात आले आहे.
वरिष्ठ प्राध्यापकांकडून चिंता व्यक्त करण्यात आल्याने हे चर्चासत्र रद्द करण्यात आले आहे. या मुद्द्यांवरून विद्यापीठ परिसरात पुन्हा निदर्शने होण्याची भीती होती. या चर्चासत्रांमध्ये भारतातील इराण, पॅलेस्टिनी आणि लेबनॉनचे राजदूत संबोधित करणार होते. इराणचे राजदूत डॉ. इराज इलाही हे ‘हाउ इराण सीज द रीसेंट डेव्हलपमेंट्स इन वेस्ट एशिया’ या विषयावर चर्चासत्राला संबोधित करणार होते. परंतु त्यापूर्वीच चर्चासत्र समन्वयक सीमा वैद्य यांनी चर्चासत्र रद्द झाल्याचे कळविले आहे.
पॅलेस्टाइनमधील कारवाईसंबंधीही या चर्चासत्रात विचार मांडले जाणार होते. यात पॅलेस्टिनी राजदूत अदनान अबू अल-हज्जा हे सहभागी होणार होते. तर 14 नोव्हेंबर रोजी लेबनॉनच्या स्थितीवर होणारी चर्चाही रद्द करण्यात आली आहे. यात लेबनॉनचे राजदूत डॉ. रबीए नर्ष यांचे संबोधन प्रस्तावित होते.
विद्यापीठाने घेतला निर्णय
कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून याच्या कारणांची माहिती नसल्याचे इराण तसेच लेबनॉनच्या दूतावासाने म्हटले आहे. वरिष्ठ प्राध्यापकांकडून चिंता व्यक्त करण्यात आल्यानेच चर्चासत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. ध्रूवीकरण करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मुद्द्यांवर चर्चासत्र आयोजित केल्यास विद्यापीठ परिसरात निदर्शने होऊ शकतात असे वरिष्ठ प्राध्यापकांनी निदर्शनास आणून दिले होते.