रणजी स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने आजपासून
वृत्तसंस्था/ मुंबई, नागपूर
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत शनिवारपासून उपांत्य फेरीतील दोन सामन्यांना प्रारंभ होत आहे. मुंबई आणि तामिळनाडू यांची उपांत्य लढत मुंबईत तर मध्यप्रदेश आणि विदर्भ यांची दुसरी उपांत्य लढत नागपूरमध्ये खेळवली जाणार आहे. मुंबईच्या लढती श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहिल.
मुंबई संघाने रणजी स्पर्धेच्या इतिहासात 41 वेळा जेतेपद मिळवण्याचा विक्रम केला आहे. आता त्यांचा उपांत्य फेरीचा सामना तामिळनाडूशी होत आहे. अलीकडेच बीसीसीआयच्या नव्या मध्यवर्ती करारातून तसेच भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर या सामन्यात विशेष लक्ष दिले जाईल. तामिळनाडूच्या दर्जेदार फिरकीसमोर श्रेयस अय्यरच्या फलंदाजीची सत्त्वपरीक्षा ठरेल. तामिळनाडूचा कर्णधार साईकिशोर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अजित राम यांनी या रणजी हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. साईकिशोरने आतापर्यंत चालू रणजी स्पर्धेत 47 तर अजित रामने 41 गडी बाद केले आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तामिळनाडूचे हे दोन्ही गोलंदाज आघाडीवर आहेत.
तामिळनाडूच्या गोलंदाजांनी या स्पर्धेत यापूर्वी झालेल्या सामन्यात शिस्तबद्ध गोलंदाजी केली आहे. तर त्यांचे फलंदाजही सातत्याने अधिक धावा जमवत आहेत. मुंबई संघाने बऱ्याच दिवसानंतर या स्पर्धेत आपले वर्चस्व ठेवले आहे. या संघाकडून अष्टपैलू कामगिरीवर अधिक भर दिला जात असल्याने त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे धावा जमवण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळते. रहाणेने या स्पर्धेत गेल्या सहा सामन्यात केवळ एकमेव अर्धशतक झळकवले आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी आतापर्यंत बऱ्यापैकी कामगिरी केली आहे पण त्यांना गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 क्रमांकात स्थान मिळवता आलेले नाही. मुंबईच्या मोहित अवस्थीने 32 गडी बाद करत 13 वे स्थान मिळवले आहे. मुंबई संघातील युवा फलंदाज मुशीर खान याची फलंदाजी चांगलीच बहरत आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बडोदा संघाविरुद्ध नाबाद द्विशतक (203) झळकवले होते. तसेच शेवटचे फलंदाज तनुष कोटीयान आणि तुषार देशपांडे यांनी या सामन्यात शतके नोंदवली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील या दोन्ही फलंदाजांचे हे पहिले शतक ठरले. त्यामुळे मुंबईला या सामन्यात 605 धावापर्यंत मजल मारता आली होती. अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तामिळनाडूने विद्यमान विजेत्या सौराष्ट्रची घोडदौड रोखली. मुंबई आणि तामिळनाडू या संघांनी यावर्षीच्या रणजी स्पर्धेत आतापर्यंत प्राथमिक फेरीत प्रत्येकी एक सामना गमवला आहे. गुजरातने तामिळनाडूला तर उत्तर प्रदेशने मुंबईला पराभवाचा धक्का दिला होता. तामिळनाडू संघातील जगदीशनने आतापर्यंत या स्पर्धेत 821 धावा जमवल्या आहेत. बाबा इंद्रजीतने 686 धावा जमवल्या. बाबा इंद्रजीतने गेल्या तीन सामन्यात 80, 187, 98 आणि 48 धावा नोंदवल्या आहेत. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या समावेशामुळे तामिळनाडूचा संघ अधिक मजबूत झाला आहे. मुंबई संघाकडे पृथ्वी शॉ, भुपेन लालवानी, मुलानी आणि शार्दुल ठाकुर यांनी बऱ्यापैकी फलंदाजी केली आहे. तामिळनाडूच्या साईकिशोर आणि अजित राम यांना संदीप वॉरियरकडून बऱ्यापैकी साथ गोलंदाजीत मिळेल.
संघ
मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, लालवानी, भटकळ, मुशीर खान, प्रसाद पवार, हार्दिक तेमोरे, शार्दुल ठाकुर, मुलानी, कोटीयान, धुमाळ, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस आणि धवल कुलकर्णी.
तामिळनाडू : आर. साईकिशोर (कर्णधार), प्रदोष रंजन पॉल, बाबा इंद्रजीत, नारायण जगदीशन, सुरेश लोकेश्वर, साई सुदर्शन, विजय शंकर, विमलकुमार, बी. सचिन, वॉशिंग्टन सुंदर, संदीप वॉरियर, त्रिलोक नाग, टी. नटराजन, मोहमद मोहमद, एस. अजित राम.
नागपूरमध्ये विदर्भ-मध्यप्रदेश आमनेसामने
नागपूरमध्ये मध्यप्रदेश आणि विदर्भ यांच्यातील चुरशीच्या उपांत्य लढतीला शनिवारपासून येथे प्रारंभ होत आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या या स्टेडियमवर आतापर्यंत दोनवेळा रणजी स्पर्धा जिंकणाऱ्या विदर्भने चार सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी तीन सामन्यात विजय मिळवला असून एक सामना गमावला आहे. विद्यमान विजेत्या सौराष्ट्रने विदर्भला पराभूत केले होते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये विदर्भने प्रतिस्पर्ध्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवले आहेत. विदर्भने सेनादलाचा सात गड्यांनी, हरियाणाचा 115 धावांनी तर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कर्नाटकाचा 127 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. विदर्भ संघातील करुण नायर हा प्रमुख फलंदाज असून त्याने या चालू रणजी हंगामात 515 धावा जमवल्या असून ध्रुव शोरेने 496, तायडेने 488 तसेच अक्षय वाडकर 452 धावा जमवल्या आहेत. नागपूरची खेळपट्टी फलंदाजीला अनकूल राहिल. विदर्भ संघाकडे आदित्य ठाकरे आणि आदित्य सरवटे हे प्रमुख गोलंदाज आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी चालू रणजी स्पर्धेत एकूण 68 गडी बाद केले आहेत.
2022 साली रणजी स्पर्धा जिंकणाऱ्या मध्dयाप्रदेश संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी सांघिक कामगिरीवर अधिक भर द्यावा लागेल. त्यांनी साखळी फेरीतील 8 पैकी 3 सामन्यात निर्णायक विजय मिळवला. मध्यप्रदेशने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आंध्रचा पराभव केला. या सामन्यात मध्यप्रदेशने केवळ 4 धावांनी थरारक विजय मिळवला. मध्यप्रदेश संघातील यश दुबे, हिमांशू मंत्री, हर्ष गवळी तसेच कर्णधार शुभम शर्मा हे प्रमुख फलंदाज आहेत. यश दुबेने या हंगामात 510 तर मंत्रीने 513 धावा जमवल्या आहेत. कुमार कार्तिकेय, सारांश जैन, कुलवंत खजोरिया हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत.
संघ
विदर्भ : अथर्व तायडे, ध्रुव शोरे, यश राठोड, करुण नायर, अक्षय वाडकर (कर्णधार), मोहित काळे, आदित्य सरवटे, हर्ष दुबे, यश ठाकुर, उमेश यादव, आदित्य ठाकरे, फझल, अक्षय वाकरे, संजय रघुनाथ, रजनीश गुरबानी, ललित यादव, सिद्देश वात, जितेश शर्मा, दर्शन नळकांडे आणि शुभम दुबे.
मध्यप्रदेश : यश दुबे, हिमांशू मंत्री, हर्ष गवळी, शुभम शर्मा (कर्णधार), वेंकटेश अय्यर, सुमित कुशवाह, सारांश जैन, अनुभव अगरवाल, कुमार कार्तिकेय, आवेश खान, कुलवंत खजोरिलिया, अमरजीत सिंग, आदित्य श्रीवास्तव, मिहीर हिरवानी, ऋषम चव्हाण आणि ए. पांडे.