घर विकून आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य
प्रत्येक दिवासासाठी 11 हजार खर्च
बहुतांश लोकांचे स्वत:चे घर निर्माण करण्याचे आणि कुटुंबासमवेत त्यात राहण्याचे स्वप्न असते. घर आता मालमत्तेपेक्षा अधिक भावना ठरली आहे. परंतु काही लोक व्यवहारिक असतात, ते वेगळ्या प्रकारे विचार करतात. सध्या एका कुटुंबाचा अजब निर्णय व्हायरल होत आहे.
चीनमध्ये राहणाऱ्या 8 लोकांच्या कुटुंबाने कमालच केली आहे. कुटुंबाने घर विकून आलिशान हॉटेलमध्ये राहण्यास सुरुवात केली आहे. याकरता त्यांना दररोज 11 हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. हा खर्च अधिक असल्याचे वाटत असेल परंतु या कुटुंबानुसार हॉटेलमध्ये राहण्यास गेल्यापासून त्यांची मोठी बचत होतेय.
चीनच्या हेनान प्रांतातील कुटुंबाने हा अजब निर्णय घेतला आहे. येथील नानयांग शहरात असलेल्या एका हॉटेलमध्ये एक सुइट घेऊन हे कुटुंब राहत आहे. चिनी सोशल मीडियावर या कुटुंबाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते सुइटची टूर घडवून आणत असून त्यांच्या सुइटमध्ये एक लिव्हिंग रुम, दोन खोल्या आहेत. याचबरोबर एक सोफा, टीव्ही. खूर्च्या आणि खाण्यापिण्याच्या सुविधा देखील आहेत. कुटुंब 229 दिवसांपासून येथे राहत आहे. या कुटुंबात एकूण 8 सदस्य आहेत. हे कुटुंब दीर्घकाळापासून येथे राहत असल्याने त्यांना भाड्यात सूट देण्यात आली आहे.
हॉटेलमध्ये राहण्यास सुरुवात केल्यापासून होणारी बचत वाढली आहे, कारण येथे वीज-पाणी, पार्पिग आणि हीटिंग यासारखे खर्च करावे लागत नाहीत. शांघायमध्ये दोन बेडरुमच्या अपार्टमेंटसाठी 20 हजार युआन म्हणजेच 2 लाख 33 हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे दर महिन्याला भरावे लागते. त्यानंतर वीज आणि पाण्यासारखी बिलं देखील भरावी लागतात. याच्या तुलनेत पूर्ण कुटुंबाला येथे साडेतीन लाख रुपयांमध्ये सर्व सुविधा मिळत आहेत. अशा स्थितीत त्यांना हे स्वस्त वाटत आहे.