परिवहन बसचालकाचे प्रसंगावधान
अपघातग्रस्त कारला चुकविण्यासाठी रस्त्याशेजारी घातली बस
बेळगाव : भरधाव कार पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकाला ठोकरून रस्त्याची एक बाजू ओलांडून पलीकडे पोहोचली. या कारला चुकविण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसचालकाने आपली बस महामार्गाशेजारील पानदुकान व वडापावच्या दुकानावर आदळली. शनिवारी मध्यरात्री होनग्याजवळ घडलेल्या या अपघातात सात जण जखमी झाले. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस आदळली नसती तर या अपघातात प्राणहानी झाली असती. विरुपाक्षप्पा चित्तापूर, महम्मदरियाज पन्हाळगड, महम्मदजाकी उस्ताद, लुकमान माडीवाले, रेहान मकानदार, महम्मदउमर माडीवाले, नियाज सलाम देसाई अशी जखमींची नावे आहेत.
विरुपाक्ष हा चित्तापूरचा आहे तर उर्वरित जखमी बेळगाव येथील राहणारे आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारमधील तरुण ढाब्यावर जेवण आटोपून बेळगावकडे येत होते. तर परिवहन मंडळाची बस बेळगावहून पुण्याकडे निघाली होती. कार दुभाजक ओलांडून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला येऊन आदळली. या कारला चुकविण्याच्या धडपडीत बसचालकाने आपली बस पानदुकान व वडापाव दुकानावर आदळली आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.